Tuesday, June 24, 2025
Home मराठी ‘सैराट’ ते ‘लय भारी’, वाचा कोणत्या सिनेमानंं केलीय किती कमाई? दुनियादारीने तर बजेटच्या ६ पट छापलेत

‘सैराट’ ते ‘लय भारी’, वाचा कोणत्या सिनेमानंं केलीय किती कमाई? दुनियादारीने तर बजेटच्या ६ पट छापलेत

टॉलिवूडचा बिगेस्ट सिनेमा म्हटलं की, नाव येतं ‘बाहुबली‘चं. बॉलिवूडचा बिगेस्ट सिनेमा म्हटलं की, नाव येतं, ‘दंगल’, ‘बजरंगी भाईजान’ आणि अशा बऱ्याच सिनेमांचं, पण बॉक्स ऑफिसवर कमाई करण्याच्या बाबतीत मराठी सिनेसृष्टीही मागे नाही बरं का. मराठी सिनेसृष्टीत कमी बजेटमध्ये बनलेल्या सिनेमांनीही जबरदस्त कमाई करत धुमाकूळ घातलाय. या लेखात आपण मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ८ सिनेमांबद्दल पाहणार आहोत.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, संतोष मांजरेकर दिग्दर्शित या मराठी सिनेमाच्या नावात जसा दम आहे, तसाच दम या सिनेमाच्या कमाईतही आहे. या सिनेमाची कथा दिनकर भोसले नावाच्या एका सामान्य, मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय माणसावर आधारित होती. यामध्ये सिनेमात महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि सचिन खेडेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. ३.५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं तब्बल २५.५० कोटी रुपयांची कमाई केली होती.

दुनियादारी
‘दुनियादारी’, कॉलेजमधल्या दिवसांच्या मैत्रीवर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन संजय जाधवांनी केलं होतं. यातील प्रत्येक पात्राने साकारलेल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. यात प्रेमाचा त्रिकोणही दाखवला गेलाय. या सिनेमात स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, उर्मिला कोठारे यांसारखे तगडे कलाकार होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार हिट ठरला होता. ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं २९ कोटींपेक्षाही अधिक कोटींची कमाई केली होती.

टाईमपास
प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान बनवणाऱ्या ‘टाईमपास’ सिनेमाची क्रेझच वेगळी होती. प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं रवी जाधवांनी. ज्यात प्रेम पुढे फक्त टाईमपास कसे राहात नाही, ही कथा दाखवलीय. हा एक कौटुंबिक मनोरंजक सिनेमा आहे. अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी सिनेमावर कौतुकाचा पाऊस पाडला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं एकूण ३३ कोटींचा गल्ला जमवला होता.

कट्यार काळजात घुसली
‘कट्यार काळजात घुसली’ हा याच नावाच्या नाटकावर आधारित मराठी सिनेमा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक सुबोध भावेनं केलं होतं. सचिन पिळगावकर आणि शंकर महादेवन यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. या सिनेमातून सुबोधने दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. दिग्गज कलाकारांचा समावेश असलेल्या सिनेमानं सर्वाधिक कमाई केली होती. ८ कोटींत बनलेल्या या सिनेमानं ३० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केली होती.

लय भारी
निशिकांत कामत दिग्दर्शित ‘लय भारी’ हा मराठीतला एक झक्कास सिनेमा आहे. ‘लय भारी’ हा ऍक्शन, कॉमेडी आणि ड्रामाचा एक उत्तम कौटुंबिक मनोरंजन सिनेमा आहे. कौटुंबिक मालमत्तेच्या समस्या, आणि त्यामुळं बिघडलेल्या गोष्टींभोवती सिनेमाची कथा फिरते. सुपरस्टार रितेश देशमुखनं याच सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. रितेश भाऊंचा पहिलाच सिनेमा असूनही सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. सिनेमानं ३५ कोंटीहून अधिक रुपयांची कमाई केली होती.

नटसम्राट
‘नटसम्राट’ हा सिनेमा आणि त्यातील डायलॉग्ज अविस्मरणीय आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमात नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, विक्रम गोखले, सुनील बर्वे आणि मृण्मयी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा सिनेमा कुसुमाग्रज यांच्या ‘नटसम्राट’ नाटकावर आधारित आहे. हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीसाठी खूप महत्त्वाचा ठरला. कारण ७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं तब्बल ४० कोटींपेक्षाही अधिक रुपयांची कमाई केली होती.

सैराट
मराठी सिनेसृष्टीला यशाच्या शिखरावर नेणारा सिनेमा म्हणून ‘सैराट’चं नाव घेतलं जातं. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा सिनेमा ही एक उच्चवर्णीय मुलगी आणि खालच्या जातीतील मुलगा यांच्यातील प्रेमकथेवर आधारित आहे. हा सिनेमा ऑनर किलिंगच्या मुद्द्यावर प्रकाश टाकतो, जे आजही आपल्या समाजातील कटू वास्तव आहे. सिनेमात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या रूपात या सिनेमानं सिनेसृष्टीला झक्कास असे कलाकार दिले. आजही या दोघांना त्यांच्या सिनेमातील नावानेच म्हणजेच आकाशला परशा, तर रिंकूला आर्ची नावानं ओळखलं जातं.

विशेष म्हणजे या सिनेमानं सहा आठवड्यात महाराष्ट्रात ५२५ स्क्रीन्सवरून ८२.९५ कोटी रुपये कमावले होते. या सिनेमाचे वर्ल्डवाईड कलेक्शन हे भुवया उंचावणारे होते. म्हणजेच ४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं तब्बल ११० कोटींची कमाई केली होती. मराठी इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून ‘सैराट’ सर्वात टॉपला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

चाहत्यांच्या काळजाला चटका लावून कलाकारांनी घेतली एक्झिट! ‘या’ दिग्गजांच्या निधनाने हादरली सिनेसृष्टी

साताजन्माच्या गाठी! तिकडं काहीही होऊद्या, पण २०२१मध्ये लग्न थाटून मजेत आहेत ‘हे’ कलाकार

हिंदी सिनेमे, नको रे बाबा! एक- दोन नाही, तर तब्बल १० चित्रपटांनी केला प्रेक्षकांचा मूड ऑफ

हे देखील वाचा