बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली, हे दोघे एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही सोशल मीडियावर त्यांचे प्रेम स्वीकारले होते. सर्वकाही ठीक चालले होते की, एक दिवस अचानक नेहाने सोशल मीडियावर त्यांचा ब्रेकअप झाल्याचे उघड केले. याशिवाय नेहाने हिमांशवर अनेक आरोपही केले होते. हिमांश ब्रेकअपवर कधी उघडपणे बोलला नव्हता. पण आता हिमांश ब्रेकअपवर मोकळेपणाने बोलला आहे आणि तो या विषयावर का बोलत नव्हता, हेही त्याने स्पष्ट केले आहे.
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत हिमांश म्हणाला, “हा माझा ब्रेकअप होता. मी याबद्दल संपूर्ण जगाला का सांगू? माझ्या घरात काय घडले, हे मी सर्वांना का सांगावे? याने बाकीच्यांना फरक का पडतो?”
ब्रेकअपनंतर हिमांशबद्दल बऱ्याच नकारात्मक गोष्टी बोलल्या जायच्या. त्यावर हिमांश म्हणाला, “हे सर्व वर्ष २०१८ पासून होत आहे. मी यापुढे नेहालाही यासाठी दोषी ठरवत नाही. ती तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे, आनंदी आहे आणि मी तिच्यासाठी आनंदी आहे. मी माझ्यासाठी आनंदी आहे. मी माझे स्वप्नवत जीवन जगत आहे. पैसे कमवत आहे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. परंतु असेही काही लोक आहेत, जे अजूनही २०१८ मध्येच अडकले आहेत, जेव्हा की आम्ही २०२१ मध्ये आहोत. आपण याबद्दल काहीही करू शकत नाही. काही लोकांना असे वाटते की, मी कोणाबरोबर काहीतरी चुकीचे केले आहे. परंतु मला माहित आहे की, मी वाईट व्यक्ती नाही.”
पुढे हिमांश म्हणाला, “मी काहीतरी चुकीचे केले असते, तर मी कधीही शांतपणे झोपू शकलो नसतो. म्हणून हे गरजेचे नाही की, मी लोकांना जाऊन सांगावे की काय बरोबर आहे आणि काय चुकीचे.”
भूतकाळाबद्दल हिमांश पुढे म्हणाला, “तिने तिच्या वतीने काहीतरी केले, तिला राग आला होता आणि तिने काहीतरी पोस्ट केले. मलाही राग आला होता, पण मी पोस्ट केले नाही. मग आता कोण जास्त टॉक्सिक आहे? टॉक्सिक असे लोक आहेत, जे आपणास लक्ष्य करतात. मला कुणालाही दोष देण्याची इच्छा नव्हती, म्हणून मी कधीही काही बोललो नाही. मला तिच्याबद्दल काहीही चुकीचे बोलायचे नव्हते.”
तसे, नेहा आता रोहनप्रीत सिंगसोबत तिच्या विवाहित जीवनाचा आनंद घेत आहे. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. एवढेच नव्हे, तर हे दोघेही सोशल मीडियावर किंवा टीव्हीवर एकमेकांचे कौतुक करतानाही दिसतात.
रोहनप्रीत सोबत आपली प्रेमकथा सांगताना नेहा म्हटली, “आम्ही दोघे शूटच्या वेळी भेटलो आणि रोहनप्रीतने मला माझा स्नॅपचॅट आयडी विचारला. मग आम्ही तिथे बोलू लागलो. यानंतर रोहनप्रीतने मला सांगितले की, तो मला पसंत करत आहे. मग पण मी म्हणाले की, ” हे पाहा, मला आता आणखी रिलेशनशिपमध्ये यायचे नाही. मला आत्ता लग्न करायचे आहे.” पण त्यावेळी रोहनप्रीत म्हणाला की, “आता माझे वय कमी आहे, मग मी इतक्या लवकर लग्न कसे करू?”
नेहाने पुढे सांगितले की, “यानंतर दोघांनीही बोलणे बंद केले होते. पण नंतर एक दिवस रोहनप्रीतने मला बिअर प्यायल्यानंतर फोन केला आणि सांगितले की, त्याला त्याचे आयुष्य माझ्यासोबत घालवायचे आहे. मला वाटले की, मद्यपान केल्यामुळे रोहनप्रीत असे बोलत आहे, दुसर्या दिवशी सर्व विसरून जाईल. परंतु दुसर्या दिवशी तो आला आणि म्हणाला, रात्री जे घडले तेच मला पुन्हा बोलायचे आहे. यानंतर मी रोहनप्रीतला सांगितले की, तुला माझ्या आईशी बोलावे लागेल.”
नेहा आणि रोहनप्रीतने मागील वर्षी २४ ऑक्टोबर, २०२० रोजी लग्न केले. ते नेहमी आपले फोटो, व्हिडिओ शेअर करताना दिसतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-