98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये (ऑस्कर) दिग्दर्शक नीरज घायवान यांचा चित्रपट ‘होमबाउंड’ याची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या श्रेणीसाठी शॉर्टलिस्टमध्ये निवड झाली आहे. इशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका होता.
मंगळवारी ऑस्कर अकादमीने 12 श्रेणींसाठी शॉर्टलिस्ट जाहीर केली असून, आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत 15 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यापैकी 5 चित्रपट अंतिम नामांकनासाठी पात्र ठरणार असून, त्याची घोषणा 22 जानेवारी रोजी होणार आहे.
या श्रेणीत भारताच्या ‘होमबाउंड’सोबत अर्जेंटिनाचा बेलेन, ब्राझीलचा द सीक्रेट एजंट, फ्रान्सचा इट वॉज जस्ट एन अॅक्सिडेंट, जर्मनीचा साउंड ऑफ फॉलिंग, इराकचा द प्रेसिडेंट्स केक, जपानचा कोकुहो, जॉर्डनचा ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू, नॉर्वेचा सेंटिमेंटल व्हॅल्यूज, पॅलेस्टाईनचा पॅलेस्टाईन 36, दक्षिण कोरियाचा नो अदर चॉइस, स्पेनचा सैराट, स्वित्झर्लंडचा लेट शिफ्ट, तैवानचा लेफ्ट-हँडेड गर्ल आणि ट्युनिशियाचा द व्हॉइस ऑफ हिंद रजब यांचा समावेश आहे.
‘होमबाउंड’च्या या यशावर चित्रपटाचा निर्माता करण जोहर (Karan Johar)भावुक झाला. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले, या प्रवासाबद्दल मला किती अभिमान आणि आनंद आहे, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. कान्सपासून ते ऑस्करच्या शॉर्टलिस्टपर्यंतचा हा प्रवास अविश्वसनीय आहे. नीरज घायवान यांनी इतकी स्वप्ने सत्यात उतरवली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. संपूर्ण कलाकार, क्रू आणि टीमला खूप प्रेम.”
करण जोहरने हेही नमूद केले की ‘होमबाउंड’ सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.
दिग्दर्शक नीरज घायवान यांनीही सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत लिहिले,‘होमबाउंड’ला 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. जगभरातून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत.”
‘होमबाउंड’ची कथा शोएब (इशान खट्टर) आणि चंदन (विशाल जेठवा) या दोन बालपणीच्या मित्रांभोवती फिरते, ज्यांचे स्वप्न पोलिस अधिकारी बनण्याचे असते. मात्र, सामाजिक व्यवस्था, वर्गभेद आणि आर्थिक अडचणी त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. मैत्री, कर्तव्य आणि तरुणांवर येणाऱ्या दबावांचा भावनिक शोध घेणारी ही कथा आहे.
या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, आदर पूनावाला, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी केली आहे. सह-निर्माते मारिजके डिसूझा आणि मेलिता टोस्कन डू प्लांटियर आहेत, तर मार्टिन स्कॉर्सेसी आणि प्रवीण खैरनार कार्यकारी निर्माते आहेत.‘होमबाउंड’चा वर्ल्ड प्रीमियर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता आणि तो टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही प्रदर्शित झाला.
मजबूत कथा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या प्रशंसेनंतरही ‘होमबाउंड’ बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळवू शकला नाही. भारतात चित्रपटाने सुमारे ₹4.85 कोटी, तर जगभरात ₹5.6 कोटी कमावले. थिएटरमध्ये मर्यादित प्रदर्शनानंतर आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे. ऑस्करच्या अंतिम नामांकनात ‘होमबाउंड’ स्थान मिळवतो का, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मूव्ही डेटची चर्चा; ‘लापता लेडीज’ची फूल कोणासोबत दिसली? सोशल मीडियावर खळबळ










