2025 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरलेला ‘धुरंधर’ (Dhurandhar)बॉक्स ऑफिसवर झंझावाती वेगाने धावतो आहे. केवळ सहा दिवसांत तब्बल 180 कोटींची कमाई करत या चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसंतीचा ठसा उमटवला आहे. दमदार कथा, ताकदीचा अभिनय, टाइट अॅक्शन आणि लक्षवेधी गाणी—या सर्व गोष्टींनी ‘धुरंधर’ला व्यापक प्रशंसा मिळत आहे.
चित्रपटातील प्रमुख कलाकार तसेच सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटाने प्रभावित झाले आहेत. विशेष म्हणजे, बॉलिवूड स्टार हृतिक रोशननेही ‘धुरंधर’ची जोरदार प्रशंसा करत एक खास पोस्ट शेअर केली. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर हृतिकने लिहिले की, “मला सिनेमा आवडला. कथेनं जेव्हा मनाचा ताबा घेतला की ते अनुभवणे म्हणजेच कला. ‘धुरंधर’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मला त्याची कथा मनापासून आवडली.” पुढे तो लिहितो, “मी त्याच्या राजकारणाशी असहमत असू शकतो, पण चित्रपट विद्यार्थी म्हणून हा चित्रपट मला खूप काही शिकवून गेला.”
हृतिकच्या या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्याच्या प्रांजळपणाचे कौतुक केले, तर काहींनी त्याच्या ‘वॉर’ आणि ‘फायटर’सारख्या चित्रपटांची आठवण करून दिली, ज्यात पाकिस्तानविरोधी कथा दाखवली गेली होती. त्यामुळे ‘धुरंधर’च्या राजकीय बाजूसंदर्भात असहमती व्यक्त करणाऱ्या हृतिकवर चाहत्यांनी थोडी खिल्ली उडवली. तरीही, हृतिकने कुठेही चित्रपटावर टीका केली नाही, उलट त्याने कलाकार आणि टीमचे भरभरून कौतुक केले.
धुरंधरची कथा काय सांगते? आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट कराचीतील ल्यारी या गुन्हेगारी आणि माफियांच्या अड्ड्यांवर आधारित आहे. कथानक एका भारतीय गुप्तहेराभोवती फिरते, जो पाकिस्तानातील गुन्हेगारी टोळ्या आणि दहशतवादी गट नष्ट करण्याच्या मिशनवर असतो. रणवीर सिंगने साकारलेली प्रमुख भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. त्याच्यासोबत सारा अली खान, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सध्या जबरदस्त प्रसिद्धी मिळवत असलेला अक्षय खन्ना यांनीही प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.
5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’चे यश वेगाने वाढत असून, चित्रपट 500 कोटींचा टप्पा ओलांडेल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय, दोन भागांच्या या कथानकाचा सिक्वेल पुढील वर्षी प्रेक्षकांसमोर येणार असल्याची चर्चा देखील रंगली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










