सनी देओल यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बॉर्डर 2’ आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा चित्रपट 23 जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून, सनी देओलसोबत दिलजीत दोसांझ, वरुण धवन आणि अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या रिलीजआधीच सोशल मीडियावर एक मजेशीर ट्रेंड जोरात व्हायरल होत आहे.
या ट्रेंडमध्ये लोक व्हिडिओ पोस्ट करत म्हणत आहेत की, “अहान शेट्टीने माझ्या पोस्टवर कमेंट केली, तर मी ‘बॉर्डर 2’ पाहायला जाईन” किंवा “दोनदा ‘बॉर्डर 2’ पाहीन.” विशेष म्हणजे अहान शेट्टी स्वतः चाहत्यांच्या रील्स आणि पोस्टवर रिप्लाय देत आहे. आता या ट्रेंडमध्ये अहानचा ,भाउजी टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर केएल राहुलही सामील झाला आहे.
केएल राहुलने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो क्रिकेट मैदानावर सराव करताना दिसतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे, “आवाज पोहोचली पाहिजे.” तर व्हिडिओवर लिहिले आहे, “जर अहान शेट्टीने या व्हिडिओवर कमेंट केली, तर मी ‘बॉर्डर 2’ दोनदा पाहायला जाईन.” या पोस्टवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्याच, पण अहान शेट्टी, सुनील शेट्टी आणि पत्नी अथिया शेट्टी यांनाही हसू आवरता आले नाही.
केएल राहुलच्या पोस्टवर सुनील शेट्टी (Sunil Shetty)आणि अथिया शेट्टी यांनी हसणाऱ्या इमोजीसह प्रतिक्रिया दिली, तर अहान शेट्टीने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर री-शेअर केला. त्याने केएल राहुलला टॅग करत तिरंग्याच्या इमोजीसह अभिमान व्यक्त केला. यानंतर हा पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
एका युजरने लिहिले, “अहान शेट्टी… कमेंट तरी कर रे!” तर दुसऱ्याने म्हटले, “सर, हा तर घरचाच विषय आहे.” आणखी एका युजरने मजेशीर कमेंट करत लिहिले, “अहान तुम्हाला घरी येऊन गाडीत बसवून ‘बॉर्डर 2’ दाखवायला नेईल, व्हिडिओ टाकायची गरज नव्हती.”
‘बॉर्डर 2’ हा चित्रपट 23 जानेवारी रोजी, म्हणजेच प्रजासत्ताक दिनापूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सनी देओल, दिलजीत दोसांझ, वरुण धवन, अहान शेट्टी, मोना सिंह, सोनम बाजवा, आन्या सिंह आणि मेधा राणा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 1997 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘बॉर्डर’चा हा दुसरा भाग तब्बल 28 वर्षांनंतर येत असल्याने सनी देओलच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा


