प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या बायोपिक वॉर ड्रामा ‘इक्कीस’ने प्रदर्शित झाल्यानंतर चौथ्या दिवशीही सिनेमागृहांत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. मात्र, मोठ्या कमर्शियल चित्रपटांशी असलेल्या तगड्या स्पर्धेमुळे चित्रपटाची बॉक्स ऑफिस कामगिरी मर्यादित राहिल्याचे पाहायला मिळत आहे. न्यू ईयरच्या मुहूर्तावर 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सुट्टीचा फायदा झाला असला, तरी कलेक्शनमध्ये सातत्य दिसून आलेले नाही.
‘इक्कीस’ने (ikkis)पहिल्या दिवशी साधारण 7 कोटी रुपये कमावत चांगली सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये मोठी घसरण होत केवळ 3.5 कोटी रुपयेच जमा झाले. शनिवारी पुन्हा थोडी सुधारणा दिसून आली आणि चित्रपटाने 4.65 कोटी रुपयांची कमाई केली. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी ‘इक्कीस’ने अंदाजे 5 कोटी रुपये कमावले. यामुळे चार दिवसांत चित्रपटाचा भारतातील एकूण नेट कलेक्शन 20.15 कोटी रुपये झाले आहे.
रविवारी थिएटरमधील ऑक्यूपेंसी समाधानकारक होती. सकाळच्या शोमध्ये केवळ 9.74 टक्के प्रेक्षक उपस्थित होते, मात्र दुपारच्या शोमध्ये ही संख्या वाढून 28.15 टक्के झाली. संध्याकाळच्या शोमध्ये सर्वाधिक म्हणजे 37.23 टक्के ऑक्यूपेंसी नोंदवली गेली, तर रात्रीच्या शोमध्ये 20.59 टक्के प्रेक्षकसंख्या दिसून आली. यावरून चित्रपटाला संमिश्र पण स्थिर प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होते.
‘इक्कीस’ हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील बसंतरच्या लढाईत शौर्य गाजवणारे सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. अवघ्या 21 व्या वर्षी परमवीर चक्र मिळवणारे ते सर्वात तरुण शहीद ठरले. चित्रपटात त्यांच्या शौर्यगाथेसोबतच तीन दशकांनंतर ब्रिगेडियर मदन लाल खेत्रपाल यांच्या पाकिस्तान दौऱ्याशी संबंधित घटनाही दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटातून अगस्त्य नंदा यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले असून, धर्मेंद्र आणि असरानी यांचीही ही शेवटची भूमिका ठरली आहे. सशक्त कथा आणि संयमित अभिनयासाठी ‘इक्कीस’ला समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रियालिटी शोमधून प्रसिद्धीला आलेला चेहरा अडचणीत, 5 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी पोलिसांची कारवाई










