कष्टांचे चीज झाले! सवाईचे इंडियन आयडॉलमधील गाणं ऐकून प्रेक्षकांसहित आईच्याही डोळ्यात आलं पाणी


इंडियन आयडॉल टीव्ही मनोरंजन क्षेत्रातला एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय रियलिटी शो आहे. देशातील नवोदित गायकांसाठी एक उत्तम मंच असणाऱ्या या शोचे या वर्षी १२ वे वर्ष आहे. देशातील कानाकोपऱ्यातून स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येतात. यावर्षी देखील या स्पर्धेत अनेक गायकांनी भाग घेतला होता. त्यातील मोजकेच स्पर्धक सध्या इंडियन आयडॉल हा ‘किताब मिळवण्यासाठी लढत आहे.

येणारा प्रत्येक आठवडा या कार्यक्रमात वेगवेगळ्या महान लोकांना समर्पित केला जातो. यात अनेक जेष्ठ आणि श्रेष्ठ गायक, वादक, संगीतकार आदींचा समावेश असतो. मात्र या आठवड्याचा शनिवार समर्पित होता, आपल्या सगळ्यांसाठी दैवत असणाऱ्या आपल्या आईला. सर्व स्पर्धकांना आईवर आधारित गाणे गायिले आणि उपस्थित असणाऱ्या जजेस, स्पर्धक आणि सर्व प्रेक्षकांना भावनिक केले.

याच स्पर्धेतील स्पर्धक असणाऱ्या सवाई भट्ट याने देखील त्याच्या आईसाठी गाणे गात सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणले. यावेळी त्याची आईदेखील त्याच्यासोबत इंडियन आयडॉलच्या मंचावर उपस्थित होती. राजस्थानमधल्या एका छोट्या गावातून आलेल्या सवाईने त्याच्या आवाजाने जजेससोबत प्रेक्षकांना देखील त्याचे फॅन्स बनवले.

सवाईने आई स्पेशल भागात राजस्थानी भाषेतील एक गाणे गायिले, त्याने या भागात त्याच्या आईला एक भेटवस्तू देखील दिली. त्याच्या आईने यावेळी त्यांनी घेतलेल्या कष्टांबद्दल सर्वाना सांगितले. त्या म्हणाल्या, ” मी रात्र रात्र जागून सवाईसाठी छोटे हत्ती, घोडे बनवायची. सारखी चहा पीत मी रात्र जागून काढायची. आज माझ्या कष्टांचे चीज झाले आहे. एवढ्या मोठ्या मंचावर उभे राहून सवाई गाणे गात आहे.”

सवाईबद्दल या शोमध्ये आल्यानंतर अनेक आरोप देखील झाले. सोनी चॅनेल आणि सवाईने तो गरीब असल्याचे खोटे चित्र प्रेक्षकांसमोर उभे केल्याचे अनेकांनी सांगितले. त्याच्या कॉन्सर्टमध्ये गाण्याचे अनेक विडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.