Tuesday, July 9, 2024

या कलाकारांच्या अकाली जाण्याने चाहत्यांना बसला होता जबर धक्का…

हे वर्ष म्हणजेच, २०२० साल हे सर्वांगाने सिनेसृष्टीसाठी घात करणारं ठरलं. यावर्षी बॉलिवूड तसेच मालिका जगतातील अनेक नामवंत कलाकारांनी त्यांचा जीवन प्रवास स्वतःहून संपवला तर काही कलाकारांवर काळाने घाला घातला.

नुकतंच डर्टी पिक्चर तसेच लव्ह, सेक्स ऍण्ड धोका सिनेमात झळकलेली आर्या बॅनर्जी ही तिच्याच घरात मृतावस्थेत आढळली. तिची हत्या होती की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत. मृत्यू समयी या अभिनेत्रीचं वय हे अवघं ३३ वर्षे होतं. आज पर्यंत बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी फार लवकर एक्झिट घेतली आहे. अशाच कलाकरांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

१. सुशांत सिंह राजपूत
काय पो छे, शुद्ध देसी रोमान्स, ड्राइव्ह, छिछोरे,केदारनाथ, एम.एस.धोनी. या आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण सिनेमांमधून झळकलेला हा बॉलिवूडचा तारा अचानक, अनपेक्षितरीत्या निखळला. याच वर्षी १४ जून रोजी वांद्रे येथील स्वतःच्याच घरी त्याने पंख्याला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत हा मृत्यूसमयी फक्त ३४ वर्षांचाच होता. बॉलिवूड मध्ये बॅकडान्सर म्हणून काम केलेला सुशांत त्याच्या कठोर परिश्रमांमुळे पुढे नायक म्हणून ओळखला जाऊ लागला होता. करियर च्या ऐन भरात असताना त्याने हे असं पाऊल उचलावं हे कुणालाच अपेक्षित नव्हतं. याच वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणारा ‘दिल बेचारा’ हा सुशांत सिंह चा अखेरचा सिनेमा ठरला.

२. दिव्या भारती
नव्वदीच्या दशकातील सुप्रसिद्ध आणि गुणी अभिनेत्री असलेली दिव्या भारती ही अवघ्या १९ वर्षांची असताना हे जग सोडून निघून गेली. तिचा मृत्यू हा तिच्या घराच्या बाल्कनीतून खाली पडल्यामुळे झाला.काही लोकांचं म्हणणं आहे की ती नशा करत असल्यामुळे खाली पडली तर काही लोकांच्या मते तिचा खून झाला होता. अशा या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू देखील एक रहस्य बनून राहिलं आहे. शोला और शबनम, दिवाना, विश्वात्मा सारख्या महत्त्वपूर्ण सिनेमांमधून ती झळकली होती.

३. प्रत्युषा बॅनर्जी
बालिका वधू शोमध्ये आनंदीची भूमिका साकारून घरात घरोघरी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने याच वर्षी १ एप्रिल रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्यावेळी अभिनेत्री मृत्युमुखी पडली त्यावेळी ती फक्त २५ वर्षांची होती. प्रत्युषा अभिनेता राहुल राज सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मृत्यूच्या काही काळापूर्वीच प्रत्युषाने आपला प्रियकर राहुललाही मृत्यूची धमकी दिली. त्यांची चॅट उघडकीस आल्यानंतर राहुलला रिमांडमध्ये घेण्यात आले.

४. जिया खान
गजनी, निशब्द आणि हाऊसफुल सारख्या चित्रपटात झळकणारी अभिनेत्री जिया खानने ३ जून २०१३ रोजी तिच्या जुहू येथील घरी आत्महत्या केली. तिच्या घरातून काही नोट्सही सापडल्या होत्या ज्यात त्याने प्रियकर अभिनेता आदित्य पंचोली याच्यावर फसवणूक केल्याबद्दल आणि अश्लील शिवीगाळ केल्याबद्दल लिहिले लिहिलं होतं.

५. स्मिता पाटील
स्मिता पाटील यांच्या सारखी सर्वगुणसंपन्न आणि अप्रतिम अभिनय कौशल्याची स्वामींनी असलेली अभिनेत्री आजतागायत झाली नाही. स्मिता पाटील यांनी ८०च्या दशकात श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर मंथन, आक्रोश, भूमिका, उंबरठा,सामना, नमकहलाल, अर्धसत्य यांसारख्या मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये झळकल्या. राज बब्बर यांच्याशी प्रेमविवाह केल्यानंतर वर्षभराने मुलगा प्रतिकच्या जन्मानंतरच दोन आठवड्यांमध्ये १३ डिसेंबर १९८६ साली त्या आपल्या सर्वांना सोडून गेल्या. स्मिता पाटील यांचं मृत्यूसमयी वय हे अवघं ३१ वर्षे होतं.

६. मधुबाला
मुगल-ए-आजम आणि कमलसारखे चित्रपट देणार्‍या मधुबाला यांचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झाले. हृदयाच्या समस्येमुळे या सौंदर्यवती अभिनेत्रीचे निधन झाले. मधुबालाने १९४२ च्या ‘बसंत’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती.

७. मीना कुमारी
ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणार्‍या मीना कुमारी यांचं वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झालं. मद्यपानाच्या अति सेवनामुळे , त्यांना लिव्हर सिरोसिस (कर्करोगानंतर एक गंभीर आजार) हा यकृताचा आजार झाला होता. या अभिनेत्रीचा पाकीजा हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या ३ आठवड्यानंतर या अभिनेत्रीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे काही तारे तारका होत्या ज्यांनी अवेळी आयुष्यातून एक्झिट घेतली. या तारे तारकांच्या जाण्याने सिनेसृष्टीचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं. कल्पना करा जर हे तारे तारका आज आपल्यात असते तर…

हे देखील वाचा