सलमानचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट जवळ जवळ प्रत्येकालाच माहिती असेल. त्याकाळी तुफान चाललेला हा चित्रपट आजही सलमानच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. याच सिनेमातून सलमान आपल्याला पहिल्यांदा नायकाच्या भूमिकेत दिसला होता. आणि त्याची नायिका होती भाग्यश्री!
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांनी ही जोडी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली होती. इतकी त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. आजमितीला या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. याचनिमित्ताने आपण या चित्रपटाविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

बर्याच वर्षांपूर्वी स्वतः सलमानने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो सुरुवातीला आपल्या सडपातळ शरीरामुळे खूप अस्वस्थ होता आणि वजन वाढवण्यासाठी काहीही खायचा. ‘मैंने प्यार किया’ चित्रपटाच्या सेटवर त्याने ३० चपात्या आणि केळी खाल्ली होती. सलमान पुढे म्हणाला की, आता तो त्याच्या आरोग्याबद्दल खूप काळजी घेतो. इतकी की फक्त अन्नाचा सुगंध घेताच पोट भरुन जातं.
भाग्यश्री ने किसिंग सीन करण्यास दिला होता नकार…
भाग्यश्री एक रूढीवादी कुटुंबातील होती, म्हणून तिने चित्रपटात कोणताही किसिंग सीन करण्यास नकार दिला. भाग्यश्रीच्या वडिलांनी तीला फक्त चुरीदार घालण्याची परवानगी दिली होती.
चित्रपटासाठी तिने पहिल्यांदाच जीन्स आणि वन पीस ड्रेस परिधान केला होता. २०१५ मध्ये एका मुलाखती दरम्यान सलमानने सांगितलं होतं की भाग्यश्रीने नकार दिल्यानंतर सूरज बडजात्या यांनी दोघांमध्ये काचेची भिंत लावण्याची कल्पना सुचवली होती.

याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भाग्यश्रीने तिच्या आई-वडिलांच्या इच्छेविरूद्ध जाऊन हिमालय दासानीशी लग्न केलं. भाग्यश्रीच्या लग्नात सलमान आणि दिग्दर्शक सूरज बड़जात्या पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. भाग्यश्रीला चित्रपटासाठी चित्रपटासाठी मनविण्याकरिता सूरज बडजात्या अनेक वेळा तिच्या घरी गेले होते.
चित्रपटातून २८ कोटींची झाली होती कमाई!
मैने प्यार किया या चित्रपटाचं बजेट फक्त २ कोटी रुपये इतकं होते, तर कमाई तब्बल २८ कोटी इतकी झाली होती. या चित्रपटासाठी सलमान खानला ३१ हजार रुपये मानधन देण्यात आलं होतं.
सुरुवातीला चित्रपटाचे फक्त २९ प्रिंट्स प्रसिद्ध झाले होते, पण मग चित्रपट हिट झाल्यानंतर आणखीन हजार प्रिंट्स जोडण्यात आले. सलमानचा हा चित्रपट इंग्रजीत ‘व्हेन लव्ह कॉल’ म्हणून रिलीज झाला होता.

गुयाना, त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील कॅरिबियन बाजारातही हा चित्रपट यशस्वी झाला. हा चित्रपट स्पॅनिश भाषेत ‘ते आमो’ या शीर्षकासह प्रदर्शित झाला होता.
स्क्रीन प्ले लिहिण्यासाठी लागले होते तब्बल १० महिने…
या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी त्यांची सर्व गाणी केवळ एका दिवसात रेकॉर्ड केली होती. कारण दुसर्या दिवशी त्यांना मैफिलिकरता परदेश दौर्यावर जायचं होतं.
चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी सूरज बड़जात्या यांना १० महिने लागले होते. चित्रपटाचा पहिला भाग सहा महिन्यांत पूर्ण झाला. तर दुसरा भाग चार महिन्यांत लिहून पूर्ण झाला होता.
असं झालं होतं लक्ष्याचं बॉलिवूडमध्ये पदार्पण!
मराठी चित्रपटांचा सुपरस्टार असलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी बॉलिवूडमध्ये या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं. त्यानंतर, ९० च्या दशकात त्यांना जवळजवळ प्रत्येक चित्रपटात एक मुख्य विनोदी अभिनेता म्हणून पाहिलं जात होतं.

या चित्रपटात दिलीप जोशी आणि राजू श्रीवास्तव यांनी लहान भूमिका साकारल्या होत्या. परवीन दस्तूरलाही मुंबईत एका नाटकाच्या वेळी पाहिल्यानंतर सीमाच्या भूमिकेसाठी अंतिम करण्यात आलं होतं. या चित्रपटानंतर परवीन १९९७ मध्ये फक्त ‘दिल के झारोखे’ या एकाच चित्रपटात दिसली होती.
तर मंडळी या होत्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटबद्दलच्या काही खास गोष्टी! आजमितीस या चित्रपटाने ३१ वर्षे पूर्ण केली आहेत परंतु आजही या चित्रपटाची लोकप्रियता ‘जैसे थे’च आहे.