Monday, July 1, 2024

क्रिकेटर इरफान पठाणच्या पहिल्या चित्रपटाच्या टिझरचा इंटरनेटवर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

आपल्याकडे क्रिकेट आणि भारतीय चित्रपटसृष्टी काही एकमेकांपासून वेगळे नाहीत. चित्रपटांमधील कलाकारांना जितकं स्टारडम मिळतं तितकंच किंबहुना त्यापेक्षा किंचित जास्तच स्टारडम हे क्रिकेटपटूंना मिळतं. कुणी चित्रपट अभिनेता आपल्याला आयपीलमध्ये क्रिकेट संघाचा मालक दिसतो तर क्रिकेटरसुद्धा आपल्याला चित्रपटांमध्ये काम करताना पाहायला मिळतात. आतापर्यंत अनेक क्रिकेटर्सनी हिंदी तसेच, मराठी,तामिळ, तेलगू, कन्नड, बंगाली भाषांच्या मनोरंजन विश्वांमध्ये कामं केली आहेत. यात सुनील गावस्कर, कपिल देव, योगराज सिंह, सचिन तेंडुलकर, श्रीसंथ हे कलाकार आहेत ज्यांनी एक चितपटामध्ये काम केलं आहे परंतू आपलं मुख्य काम म्हणजे क्रिकेटच मैदानही गाजवलं आहे.

आता या यादीत आणखीन एका क्रिकेटपटूची भर पडली आहे तो म्हणजे भारताचा एकेकाळचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण! त्याच्या पहिल्या व नव्या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच झाला आहे. त्यातील इराफानच्या कामाचं कौतुक देखील होत आहे. चला तर मग पाहुयात कोणत्या सिनेमातून इरफान ७० एमएमच्या स्क्रीनवर झळकणार आहे ते…

माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण कोब्रा या तामिळ चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करतोय. या चित्रपटात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शुक्रवारी ८ जानेवारी रोजी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि यूट्युबवर फार कमी वेळेत या चित्रपटाच्या टीझरने धुमाकूळ घातला. एकाहून एक जबरदस्त हिट चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्ददर्शक अजय गमामुत्थु यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. मागील वर्षी आपल्या ३६ व्या वाढदिवसाला इरफानने या चित्रपटात काम करणार असल्याची घोषणा केली होती.

कोब्रा या चित्रपटात इरफान आपल्याला एक तुर्की इंटरपोल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सोबतच दाक्षिणात्य सुपरस्टार चियान विक्रम मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चियान विक्रम या चित्रपटात एक गणिततज्ञाच्या तसेच हेराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चियानचा पाठलाग करताना आपल्याला इरफान पाहायला मिळणार आहे. तसेच या दोघांच्याही जोडीशिवाय सिनेमामध्ये श्रीनिधी शेट्टी सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

इरफानने २००३ ते २०१२ या कालावधीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केलं आहे. यादरम्यान त्याने १२० वनडे सामन्यात १५४४ धावा आणि १७३ विकेट्स घेतल्या आहेत. तर २९ कसोटी सामन्यात ११०५ धावा आणि १०० विकेट्सची कामगिरी केली आहे. शिवाय टी२० क्रिकेटमध्येही त्याने २४ सामन्यात १७२ धावा व २८ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच आयपीएलमध्ये १०३ सामने खेळले असून ११३९ धावा आणि ८० विकेट्सची नोंद केली आहे. सध्या इरफान आपल्याला आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचं समालोचन करताना देखील पाहायला मिळतो.

हे देखील वाचा