राजस्थानमधील पंक्चर काढणाऱ्याचा मुलगा, मुंबईत आला आणि त्यानं बॉलिवूड गाजवलं. शाळेत शिकताना शिक्षकांनी नाव विचारलं तरी लाजणाऱ्या या मुलानं पुढं हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला. आता तुम्ही म्हणाल, हा कोण बरं. तर हा दुसरा तिसरा कोण नसून आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजेच इरफान खान (Irrfan Khan). सध्या तो आपल्यात नाही हे दुर्देवंच. पण त्यानं कामच असं केलंय की, पुढच्या एक- दोन नाही, तर कदाचित 7पिढ्याही त्याचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आज आपण याच इरफानच्या करिअरबद्दल जाणून घेऊया. तसंच त्याच्या आठवणींनाही उजाळा देऊ…
इरफानचा जन्म जयपूरचा. प्रत्येक आई-बापाला आपल्या मुलानं मोठेपणी चांगली नोकरी करावी असंच वाटत असतं… इरफानच्याही आईला असंच वाटायचं… त्यांची इच्छा होती की, आपल्या मुलानं मोठेपणी लेक्चरर बनावं. हे असले नाटकं- फिटकं करू नये. म्हणजे त्याची आई सिनेमाला वाईटच म्हणायची. वडील आपलं टायरचं दुकान चालवायचे. तर इरफान तिकडं लहान मुलांना ट्यूशन द्यायचा. त्याला मोठ्या बापाच्या घरातल्या मुलांना मिळाऱ्या पॉकेटमनीसारखं काही मिळत नसायचं. आपल्या कामाचे त्याला 15रुपये महिन्याला मिळायचे. ते जमा केले आणि विकत घेतली एक सायकल. दररोज तेच तेच करून पकलेल्या इरफानच्या मनात वादळ तयार व्हायचं की, आपल्याला हे असलं काही करायचं नाहीये. शाळेत शिक्षक शिकवताना काहीच कळायचं नाही. फक्त ऐकायचा पण डोक्यात काही शिरत नव्हतं. पण डोक्यात एकच होतं की, काहीतरी वेगळं करायचंय. ज्यामुळे मनाला शांती मिळेल.
इरफानला सिनेमे पाहायचं वेड लागलं होतं. त्यावेळी प्रेम प्रकाश नावाचं थिएटर होतं, आज ते गोलचा नावानं ओळखलं जातं. त्यात इरफान दिलीप कुमार आणि नसीरुद्दीन शाह यांसारख्या दिग्गज कलाकारांचे सिनेमे पाहायचा. दिलीप कुमारांचा ‘नया दौर’ त्याने तिथं पाहिला होता. त्यानंतर त्यानं एकच निश्चय केला की, भावा बनणार तर अभिनेताच… आता त्यानं ठरवलं तर होतंच… पण त्याच्याकडं गुड लूक्सही नव्हते आणि पर्सनॅलिटीही नव्हती… त्यानं विचार केला की, जर कुणाला सांगायचं म्हटलं, तर फुकटची थट्टा होऊन बसेल. पण त्यानं धाडस करून एका जवळच्या मित्राला सांगितलं. त्यानं मित्राला आधीच सांगितलं… माझी थट्टा करू नको भावा. मला ना अभिनेता व्हायचंय. आता त्याचा मित्र तर कुठंपर्यंत रोखून धरणार होता. दोन दिवस गेले, तो काहीच बोलला नाही. त्यानंतर त्या मित्रानं अशी काही थट्टा केली की, इरफानही म्हणाला, याला उगाच सांगितलं राव.
तो गेला एनएसडीमध्ये म्हणजेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये… कारण त्याला माहिती होतं की, अभिनयाचा रस्ता हा तिथूनच जातो. पण त्यानं आपल्या आईला खोटं सांगितलं. म्हणाला, ‘आई मी एक कोर्स करण्यासाठी जातोय. जेव्हा परत येईल तेव्हा तूही पाहा… जयपूर युनिव्हर्सिटीत थेट लेक्चरर बनतो की नाही…’ आता आईपण खुश झाली. मुलगा दिल्लीला जातोय. शिकेल, आणि मोठी नोकरी करेल, जसे मला हवंय. आता एनएसडीमध्ये आला, तर तिथंही खोटंच बोलला. बघा मंडळी कधी कधी खोटं बोलणंही चांगलं असतंय. एनएसडीमध्ये गरजेचं असतंय की, तुम्ही आधी कमीत कमी 10नाटकात काम केलं पाहिजे. पण इरफाननं तर काहीच केलं नव्हतं. पण ऍडमिशन घ्यायचं होतं आणि हीरो बनायचं होतं. तिथंही खोटं बोलला… सांगून टाकलं हा मी पण 10नाटकात काम केलंय. मग काय मिळालं ऍडमिशन.
इरफान आपल्या वर्गातील जास्त हुशार मुलगा नव्हता. तो सावळा होता, कुणाशी जास्त बोलायचाही नाही. त्यामुळे सर्वांना वाटले की, याच्याच्यानं काही व्हायचं नाही. पण कुणाला माहिती होतं की, येत्या काही वर्षांमध्ये हा एक दिग्गज अभिनेता बनणारंय… त्याची भेट सुतापा सिकंदरशी झाली. ती त्याची गर्लफ्रेंडही झाली. सुतापाचं घरचं चांगलं होतं. जेव्हाही ती आपल्या मित्रांना आपल्या घरी न्यायची, तेव्हा इरफान तिथं तिच्या भावाच्या लायब्ररीत जाऊन बसायचा. आता कोणता मुलगा आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी गेल्यावर लायब्ररीत जाऊन बसतो…? जरा त्या मुलीच्या आईशी बोलायचं, तिला लाडी- गोडी लावायचं सोडून हा गडी जाऊन बसायचा लायब्ररीत. पण हा होता इरफान… कोणतीही गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करायचा.
त्याचं ऍडमिशन जेव्हा एनएसडीमध्ये झालं होतं, तेव्हाच त्याच्यावर आभाळ कोसळलं… त्याच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला. इरफान त्याच्या कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा होता. कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. मध्यमवर्गीय कुटुंबात वडिलांचे छत्र हरपल्यानंतर सर्व जबाबदारी घरातील मोठ्या मुलावर येते. तर ही जबाबदारीही इरफानवर आली. त्यानं वडिलांच्या दुकानावर बसायला सुरुवात केली. पण काय करणार ना… एकीकडं स्वप्न होतं… तर एकीकडं कुटुंब. अशात एका व्यक्तीने त्याची साथ दिली. ज्यामुळं तो जयपूरमधून दिल्लीत आला. तो व्यक्ती होता इरफानचा छोटा भाऊ. तो म्हणाला की, मी कुटुंबाची जबाबदारी सांभाळतो. तू जा आणि आपलं स्वप्न पूर्ण कर. त्यानंतर इरफान एनएसडीमध्ये आला. तिथं मीरा नायरनं त्याला ‘सलाम बॉम्बे’ सिनेमासाठी साईन केलं. मीरा नायरसारखी एवढी मोठी डिरेक्टर इरफानसारख्या न्यूकमरला साईन करणे त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आधी त्याला लीड रोलसाठी साईन केले. त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला. पण कुठंतरी माशी शिंकलीच. मीर नायरनी त्याला सांगितलं की, हे बघ मी तुला लीड रोलसाठी घेत नाहीये. तुला दुसरा रोल देते. तोही म्हणाला काहीच प्रॉब्लेम नाही. न्यूकमर आहे. मला कोणताही रोल मिळो.
वर्कशॉप सुरू झालं. दोन महिने तयारी चालली. दोन महिन्यांनंतर त्याला सांगण्यात आलं की, तू यामध्ये काही काम करत नाहीये बघ. तू त्या रोलमध्ये सूट होत नाहीये. विचार करा… दोन महिने ज्या टीमसोबत रिहर्सल केली, प्रॅक्टिस केली. ज्या रोलमध्ये घुसण्यासाठी त्याने मेहनत घेतली, तो रोलच त्याचा काढून टाकला. त्यानं त्या क्रू टीमला रामराम ठोकला, आणि आपल्या स्वप्नाच्या दिशेने वाट धरली. त्याला काही टेलीफिल्म्स मिळाल्या. ज्यातून त्याला फायदा झाला. त्यानंतर त्याला सीरियल्स मिळू लागल्या. पण प्रॉब्लेम हा होता की, करायचं काही तरी औरच… त्याला काय फक्त सीरियल्स, टेलीफिल्सच करायच्या नव्हत्या. त्याला यायचं होतं ते म्हणजे बॉलिवूडमध्ये, सिनेमामध्ये. पण जेव्हाही तो एखाद्या डिरेक्टरला फोन करायचा. सुनील मी इरफान खान… तर ते म्हणायचे की, कोण इरफान खान? कुणी म्हणायचं, उद्या 12वाजता ये… पण तिथे १२ वाजता पोहोचल्यानंतर समजायचं की, कोण, कुणी बोलावलंय 12वाजता… नंतर ये. खूप म्हणजे खूप रिजेक्शन आले… पण स्ट्रगल सुरूच होते. मनाच्या एका कोपऱ्यात दु:खही व्हायचं…पण वाटायचं… ठीके… करेल मी… होईल व्यवस्थित.
एनएसडीमध्ये इरफानसोबत होते तिग्मांशू धूलिया… ते आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक. त्यांनीच इरफानसोबत हा कोर्स केला होता. त्यांनाही वाटायचं की, या मुलामध्ये टॅलेंट आहे, ते मी जेव्हा सिनेमा बनवेल, तेव्हा त्याला नक्कीच कास्ट करेल. हे महत्त्वाचं आहे की, इरफानला आता स्ट्रगल करताना तब्बल2 दशकांचा काळ लोटला होता. तब्बल20 वर्षे… एवढ्या वेळात तर कुणीही आपलं ध्येय बदललं असतं… पण तो इरफान होता. हार कसली मानतोय… शेवटी त्याला एक असा ब्रेक मिळाला, ज्याने त्याचे आयुष्य बदलून टाकले. हा सिनेमा होता 2001 मधला हॉलिवूडचा, ‘द वॉरिअर.’ त्यातही लीड रोल. विचार करा ज्या माणसाला बॉलिवूड काम देत नव्हते, त्याला हॉलिवूडने काम दिलं. या सिनेमानंतर सर्वत्र एकच नाव गरजू लागलं, ते म्हणजे इरफान. त्यानंतर त्याने आपला मित्र तिग्मांशूचा सिनेमा ‘हासिल’मध्ये काम केलं. त्यात त्यानं व्हिलनचा रोल केला होता. त्यानंतर सर्वांना समजलं होतं की, हा तर एक कमालीचा ऍक्टर आहे.
पुढे इरफाननं कधीही मागे वळून पाहिलं नाही… मात्र, त्याने आपल्या चाहत्यांसोबतच आख्ख्या सिनेसृष्टीला धक्का देत 29 एप्रिल, 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला. आता त्याचा मुलगा बाबिल खान आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत सिनेसृष्टीत येण्यासाठी सज्ज झालाय.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
खोटं बोलून ऍडमिशन घेतलं अन् पुढं जाऊन सुपरस्टार बनला इरफान खान, वाचा अंगावर काटा आणणारी स्टोरी
म्हणून बदललं होतं दिवंगत अभिनेते इरफान खान यांनी स्वतःचं खानदानी नाव!