Sunday, February 1, 2026
Home बॉलीवूड गरिबीत वाढलेला अभिनेता नशिबाने झाला सुपरस्टार; साधेपणा कायम, आज मुलगाही बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतो

गरिबीत वाढलेला अभिनेता नशिबाने झाला सुपरस्टार; साधेपणा कायम, आज मुलगाही बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतो

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ आज आपला ६९वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. झोपडपट्टीत गेलेलं बालपण, संघर्षांनी भरलेली सुरुवात आणि अखेर सुपरस्टारपदापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच एखाद्या चित्रपटासारखाच आहे. आज ‘जग्गू दादा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॅकी श्रॉफ यांची कहाणी जाणून घेऊया.

जयकिशन काकुभाई श्रॉफ उर्फ जॅकी श्रॉफ यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५७ रोजी मुंबईतील तीन बत्ती परिसरात झाला. ते तब्बल ३३ वर्षे एका चाळीत राहिले. वडील व्यवसायिक असले तरी घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यामुळे जॅकींना लहान वयातच शाळा सोडावी लागली. ११वीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी अनेक कामे केली—थिएटरबाहेर शेंगदाणे विकणे, ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करणे, अगदी फ्लाइट अटेंडंट होण्यापर्यंत विविध नोकऱ्या केल्या.

एका मुलाखतीत जॅकींनी चाळीतील दिवस आठवताना सार्वजनिक शौचालयांसाठी लागणाऱ्या लांब रांगा, हातात मग घेऊन पहाटे उभे राहण्याचे दिवस सांगितले आहेत. शाळा किंवा कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी त्यांना अधिक लवकर उठावे लागे.

जॅकी श्रॉफ यांना ‘जग्गू दादा’ हे नाव मिळण्यामागे भावनिक कथा आहे. त्यांचे मोठे बंधू हेमंत हे त्यांच्या चाळीत सामाजिक कामांसाठी ‘दादा’ म्हणून ओळखले जात. एका मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात हेमंत यांचे निधन झाले, तेव्हा जॅकी फक्त १० वर्षांचे होते. या घटनेनंतर मित्रांनी जॅकींना ‘जग्गू दादा’ म्हणायला सुरुवात केली.

आजही जॅकी श्रॉफ (Jackie Shroff)अनेक वंचित कुटुंबांची जबाबदारी घेत आहेत. मुंबईतील तीन बत्तीपासून पाली हिलपर्यंत सुमारे १०० गरजू कुटुंबांची ते काळजी घेतात. रस्त्यावरच्या मुलांसाठी ते देवदूतासारखे आहेत—अनेक मुलांकडे ‘जग्गू दादा’चा फोन नंबर आजही आहे.

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत टायगर श्रॉफनेही चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. पहिल्याच ‘हिरोपंती’ चित्रपटातून तो स्टार ठरला. दमदार अ‍ॅक्शन, जबरदस्त डान्स आणि फिटनेससाठी ओळखला जाणारा टायगर आज बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. झोपडपट्टीतून सुरू झालेला हा प्रवास आज सुपरस्टारपदापर्यंत पोहोचला आहे. जॅकी श्रॉफ यांचा संघर्ष, संवेदनशीलता आणि समाजप्रेम आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

फेब्रुवारीत बॉलीवूडचा महासंग्राम! एकाच महिन्यात 8 मोठे चित्रपट, बॉक्स ऑफिसवर होणार जबरदस्त टक्कर

हे देखील वाचा