Monday, July 1, 2024

‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या शाहीर साबळेंच्या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर केदार शिंदेनी शेअर केली भावुक पोस्ट

प्रत्येक मराठी माणसाच्या अंगातील रक्त जागृत करणारे आणि ऐकताच शहारा उभे करणारे गीत म्हणजे ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’. या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल ६२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळाले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील घेतलेल्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाली असून आता ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे आता महाराष्ट्राचे राज्यगीत असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

याच निमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान आणि हुशार दिग्दर्शक अशी ओळख आलेल्या केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “My real Hero. #महाराष्ट्रशाहीर साबळे. बाबा, तुमच्या जन्मशताब्दी वर्षात पुन्हा एकदा तुमचा झंझावात निर्माण होतोय. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत आता राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं. तुमच्या मनात खरच ही इच्छा असणार. १९६० पासून अव्याहतपणे तुम्ही हे गौरव गीत जगभर गाऊन प्रसिद्ध केलत. तुम्ही आता नसताना पुढच्या कितीतरी पिढ्या आता याच गाण्याला मानसन्मान देतील. या वर्षात तुमच्या जीवनावर आधारित सिनेमा सुध्दा येईल. आत्मा जागृत असतो. आणि तो जे आपल्याला हवं ते करून घेतो. तुम्ही करताय. आम्ही केवळ निमित्तमात्र. २८ एप्रिल रोजी जेव्हा तमाम जनता सिनेमा पाहील आणि तुमच्या कार्याला मानाचा मुजरा करेल, तेव्हाच मी जन्माला येण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

तत्पूर्वी शाहीर साबळे हे केदार शिंदे यांचे आजोबा असून, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या आजोबांच्या अर्थात शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा एक चित्रपट तयार केला आहे. येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, अभिनेता अंकुश चौधरी यात शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार आहे.

दरम्यान ‘महाराष्ट्र गीत’ अशी नवी ओळख मिळालेले ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे गीत प्रसिद्ध कवी राजा बढे यांनी लिहिले असून, श्रीनिवास खळे यांनी हे ते संगीतबद्ध केले होते. तर कृष्णराव ऊर्फ शाहीर साबळे यांनी आपल्या खड्या आवाजात हे गीत गायले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
चुरा लिया है तुमने जो दिल को…! रवीना टंडनचा प्रमेता पाडणारा लूक, पाहाच फोटो
चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाचा अपमान करायचा सलमान खान? खुद्द कबीर खान यांनीच केला खुलासा

हे देखील वाचा