Saturday, June 29, 2024

जिया खान आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, अभिनेत्रीच्या आईविरोधातच सुरज पांचोलीने दाखल केली तक्रार

बॉलिवूडच्या झगमगाटी दुनियेत असे अनेक धक्कादायक किस्से आहेत जे ऐकून प्रत्येकाच्याच अंगावर काटा उभा राहतो. असाच एक गाजलेला किस्सा म्हणजे अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) आत्महत्या प्रकरण. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अल्पावधीतच सर्वांची आवडती झालेल्या जिया खानच्या मृत्यूने संपूर्ण सिनेजगताला मोठा धक्का बसला होता. या आत्महत्या प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा झाली होती. तसेच अभिनेता सुरज पांचोलीवर तिच्या हत्येचा आरोपही लावण्यात आला होता. याच प्रकरणात आता नव्याने आणखी एक खुलासा झाला आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, जिया खान मृत्यू प्रकरणी अभिनेता सूरज पांचोली याने विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जात न्यायालयाने राबिया खानविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी करण्याची मागणी केली आहे. पंचोलीच्या म्हणण्यानुसार, राबिया समन्स टाळत आहे आणि जाणूनबुजून विशेष सीबीआय कोर्टासमोर हजर होत नाही. सूरज पांचोलीचे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले की, जियाची आई राबिया खान खटला लांबवण्याचा प्रयत्न करत आहे.

हस्तलिखित अर्जात असे लिहिले आहे की, “अभ्यायादी पक्षाने मूळ तक्रारदाराला अनेकदा समन्स बजावले आहे, परंतु ती तिचे म्हणणे मांडण्यासाठी या न्यायालयात हजर होत नाही. असे दिसते की मूळ तक्रारदार या न्यायालयाकडे सहकार्य करू इच्छित नाही. आणि खटल्याच्या सुनावणीला विलंब करण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याचे टाळत आहे.” विशेष सीबीआय न्यायाधीश एएस सय्यद यांनी पंचोलीच्या याचिकेवर सीबीआयला उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

फेब्रुवारी २०२२ पासून कोर्ट राबियाला तिचे म्हणणे मांडण्यासाठी समन्स बजावत आहे. तिने आतापर्यंत दोन जबाब नोंदवले असून ती लंडनहून मुंबईत साक्ष देण्यासाठी का येऊ शकली नाही याचे उत्तर विचारले होते. एकदा तिने सांगितले की तिचे इंटरनेट काम करत नाही आणि दुसऱ्यांदा तिच्या घरात पाणी शिरल्याचे कारण राबियाने दिले होते.  दरम्यान 2013 मध्ये अभिनेत्री जिया खान तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. त्यानंतर तिचा प्रियकर सूरज पांचोलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली जुहू पोलिसांनी अटक केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा