Monday, February 24, 2025
Home हॉलीवूड प्रेमाची कथा द्वेषात कशी बदलली? जॉनी-अंबरची आतापर्यंतची संपूर्ण कहाणी जाणून घ्या…

प्रेमाची कथा द्वेषात कशी बदलली? जॉनी-अंबरची आतापर्यंतची संपूर्ण कहाणी जाणून घ्या…

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्याची पत्नी अंबर हर्ड (Amber Heard) यांच्यातील वाद कोणापासून लपलेला नाही. दोघांमधील या कायदेशीर लढाईत एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत आहेत. या हायव्होल्टेज ड्रामानंतर आता अखेर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. जॉनी डेपच्या बाजूने निकाल देताना न्यायालयाने अंबरला दंड ठोठावला आहे. पण ज्यांना या हायप्रोफाईल प्रकरणाची माहिती नाही, त्यांना आम्ही सोप्या भाषेत दोघांमधील हा वाद, त्यांच्या भेटीचा प्रवास प्रेमात कसा बदलला आणि नंतर हे प्रकरण द्वेषापर्यंत कसे पोहोचले हे सांगणार आहोत.

‘अशी’ झाली दोघांची भेट
हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप आणि अभिनेत्री अंम्बर हर्ड यांची भेट २००९ साली ‘द रम डायरी’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात जॉनीने पत्रकाराची भूमिका साकारली होती, तर अंबर हर्ड त्याचे प्रेम असलेल्या चेनॉल्टच्या भूमिकेत दिसली. (johnny depp amber heard from marriage to court verdict know what happened till now)

‘असे’ झाले प्रेम
साल २००९ मध्ये एकत्र काम केल्यानंतर, दोघांनीही आपापल्या पार्टनरपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर दोघांनी २०११ पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर जॉनी आणि अंबरने २०१५ मध्ये एका खासगी समारंभात लग्न केले.

वर्षभरातच दोघांमध्ये निर्माण झाला दुरावा
लग्नाच्या पुढच्या वर्षीच, म्हणजे २०१६ मध्ये जॉनी आणि अंबरमध्ये भांडण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या वर्षी मे महिन्यात अंबर तिच्या चेहऱ्यावर जखमा घेऊन कोर्टात पोहोचले आणि जॉनीला तिच्यापासून दूर राहण्याचे आदेश देण्याची विनंती कोर्टाला केली. अंबरने दावा केला होता की, जॉनीने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि रागाच्या भरात फोन तिच्या चेहऱ्यावर फेकला. पण जॉनीच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून लावत अंबरने आर्थिक फायदा घेतल्याचा आरोप केला.

शेवटी झाला घटस्फोट
या प्रकरणानंतर दोघांनी एकत्रितपणे वेगळे होण्याची घोषणा केली. २०१७ मध्ये दोघांमधील घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यांचे लग्न अधिकृतपणे तुटले. अंबर हर्डला जॉनी डेपकडून ७ दशलक्ष डॉलर पोटगी मिळाली, जी तिने मुलांच्या रुग्णालयाला दान केली.

अंबरच्या लेखाने उडाली खळबळ
जॉनी डेपपासून विभक्त झाल्याच्या एका वर्षानंतर, अंबर हर्डने वॉशिंग्टन पोस्टमध्ये घरगुती हिंसाचार आणि स्त्रियांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करणारा लेख लिहिला. यामध्ये अंबरने जॉनीचे नाव न लिहिता सांगितले की, महिलांना त्रास देणारे लोकांना कसे वाचवले जाते. नाव न लिहिल्यानंतरही सर्वांनी याला जॉनीशी जोडून पाहिले, ज्याचा फटका अभिनेत्याला सहन करावा लागला. या वादानंतर डिज्नीने जॉनीला ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ या बहुचर्चित चित्रपटातून काढून टाकण्याची घोषणा केली.

जॉनी डेपने दाखल केला मानहानीचा खटला 
वॉशिंग्टन पोस्टमध्ये २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या या लेखासाठी जॉनी डेपने अंम्बर हर्डविरुद्ध पाच कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला. जॉनीच्या वकिलाने दाखल केलेल्या याचिकेत दावा करण्यात आलाकी, अंबर स्वत:साठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी खोटे आरोप करत आहे, जी फसवणूक आहे. यानंतर अम्बर हर्डनेही डेपवर मानहानीचा खटला दाखल केला. हे प्रकरण डेपच्या वकिलाच्या या विधानाबाबत होते.

चर्चेत आलं प्रकरण
या हायप्रोफाईल प्रकरणाने जगभर चर्चा रंगवल्या. न्यायालयीन खटल्यांदरम्यान, अंबरने साक्ष दिली की डेप तिला मारहाण करत असे. एवढेच नाही, तर तिने डेपवर घरगुती हिंसाचार तसेच लैंगिक हिंसाचाराचे आरोप केले. डेपनेही हर्डवर अनेक गंभीर आरोप केले. या खटल्यात अनेक सेलिब्रिटींची साक्ष घेण्यासाठी कोर्टाला १०० तासांपेक्षा जास्त वेळ लागला. दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.

या वादात कोण जिंकलं?
‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ स्टार जॉनी डेपने या दीर्घकाळ चाललेल्या हाय-प्रोफाइल कायदेशीर लढाईत विजय मिळवला. या कायदेशीर लढाईत एकामागून एक अनेक धक्कादायक खुलासे झाले. ज्युरीने अंबर हर्डला मानहानीसाठी दोषी ठरवले आणि तीच जॉनी डेपची बदनामी करत असल्याचा निर्णय दिला. यासोबतच अंबरला जॉनीला १५ मिलियन डॉलर (सुमारे ११६ कोटी रुपये) नुकसानभरपाई देण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे, ज्युरीने डेपला मानहानीच्या काही प्रकरणांमध्ये दोषी ठरवले आणि त्याला अंबर हर्डला २ मिलियन डॉलर (सुमारे १५.५ कोटी रुपये) नुकसान भरपाई देण्यास सांगितले.

जॉनीने जारी केलं निवेदन 
निकाल आपल्या बाजूने आल्यानंतर, डेपने आनंद व्यक्त केला आणि म्हटले की, “ज्युरीने माझे जीवन मला परत दिले आहे. सत्याचा कधीच पराभव होत नाही. माझे नवीन आयुष्य सुरू होणार आहे. सत्य समोर आणणे हा या खटल्याचा उद्देश होता आणि त्यामुळेच मला ते लढण्याचे बळ मिळाले.”

अंबरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया 
न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हर्डने जगभरातील महिलांसाठी हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. अभिनेत्री म्हणाली की, “या निर्णयामुळे माझ्यासोबतच इतर महिलांनाही धक्का बसेल. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराचे गांभीर्य कमी होईल.” सध्या हे प्रकरण खूप चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा