ग्वाल्हेरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या संगीत मैफिलीत मोठा गोंधळ झाला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ग्वाल्हेरच्या मेळा मैदानावर हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दिवसभर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उपस्थिती लावली होती. मात्र संध्याकाळी होणाऱ्या कैलाश खेर यांच्या लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेल्याने कार्यक्रम अर्ध्यावरच थांबवावा लागला.
कैलाश खेर (Kailash Kher)यांनी गायन सुरू केल्यानंतर काही वेळातच प्रेक्षकांमध्ये गोंधळ सुरू झाला. मोठ्या संख्येने लोक स्टेजकडे धाव घेऊ लागले. परिस्थिती चिघळताना पाहून कैलाश खेर संतप्त झाले आणि त्यांनी माईकवरून उपस्थितांना संयम राखण्याचे आवाहन केले. “कृपया प्राण्यांसारखे वागू नका, सभ्यतेने वागा,” असे म्हणत त्यांनी गर्दीला शांत राहण्याचे आवाहन केले.
याचवेळी त्यांनी स्टेजवरील कलाकारांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडेही मदतीची मागणी केली. मात्र, सुरक्षा यंत्रणा परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकली नाही. काही लोक थेट स्टेजजवळ पोहोचल्याने अखेर कैलाश खेर यांना आपला कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
हा सांस्कृतिक कार्यक्रम दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही याच ठिकाणी उपस्थिती लावत नागरिकांशी संवाद साधला होता. दिवसभर सुरक्षेची व्यवस्था योग्य होती, मात्र सायंकाळच्या मैफिलीदरम्यान अचानक वाढलेल्या गर्दीमुळे व्यवस्थेत अडथळा निर्माण झाला.
आपल्या आवडत्या गायकाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी ग्वाल्हेर मेळा मैदानावर प्रचंड गर्दी जमली होती. कार्यक्रम हाऊसफुल्ल होता. काही चाहत्यांनी उत्साहाच्या भरात स्टेजकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ वाढला आणि मैफल अर्ध्यावरच थांबवावी लागली.
कैलाश खेर हे त्यांच्या सुरेल आवाजामुळे आणि भक्तीपर गीतांमुळे ओळखले जातात. त्यांच्या मैफिलींमध्ये नेहमीच मोठी गर्दी उसळते. मात्र, अशा प्रकारच्या अनियंत्रित वर्तनामुळे कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आणि कार्यक्रमात व्यत्यय येतो, असे पुन्हा एकदा या घटनेतून दिसून आले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
कुटुंबासोबत रणबीर कपूरने साजरा केला ख्रिसमस; आलिया भट्टच्या नणंदेने पार्टीचे फोटो केले शेअर










