मध्यप्रदेश राज्य शासनातर्फे कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी देण्यात येणारा मानाचा कालिदास सन्मान राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ धृपद गायक पं.उदय भवाळकर यांना त्यांच्या शास्त्रीय संगीतातील अतिशय प्राचीन अशा धृपद संगीतातील भरीव योगदानासाठी नुकताच प्रदान करण्यात आला.
मंगळवार १२ नोव्हेंबरला पं. उदय भवाळकर यांना उज्जैन येथे मा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांच्या हस्ते रोख रक्कम ५ लाख आणि ताम्रपत्र अशा स्वरूपाचा वर्ष २०२२ साठीचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मध्यप्रदेश शासन आणि सांस्कृतिक विभागातर्फे साहित्य, संगीत, सृजनात्मकता अशा बहुउल्लेखनीय कार्यात अतुल्य योगदान देणाऱ्या अशा कलाकारांना प्रतिवर्षी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार जाहीर होतात.
आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना गायक पं.उदय भवाळकर म्हणाले की, ‘मला मध्य प्रदेश सरकारच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा असा कालिदास सन्मान भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड ह्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला ह्याचा मला अतीव आनंद आहे. हा पुरस्कार मी माझे गुरुजन आणि माझ्या आई वडिलांना समर्पित करतो. हा पुरस्कार हा प्राचीन अशा धृपद शैलीचा सन्मान आहे असे ही मला वाटते. तसेच धृपद क्षेत्रात अजून चांगले काम करण्याची माझी जबाबदारी देखील वाढली आहे ह्याची माझ्या मनात जाणीव आहे. माझी धृपद साधना ही अशीच अखंडपणे चालू राहो आणि माझ्या शिष्यांना ही उत्तम प्रकारे घडविण्याचे काम माझ्या हातून घडत राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.बावधन,पुणे येथे जे धृपद विद्यार्थ्यांसाठी स्वरकुल उभे आहे त्या मार्फत मी माझे कार्य सदैव करीत राहीन.
पंडित उदय भवाळकर, हे मध्य प्रदेशातील मालवा प्रदेशातील उज्जैनच्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहेत. ते झिया मोहिउद्दिन डागर आणि झिया फरिदुद्दीन डागर ह्यांचे शिष्य असून, देश विदेशातील अनेक रसिकांपर्यंत त्यांनी आपले धृपद संगीत विविध महोत्सव आणि मैफलींमधून पोहोचविले आहे. मागील २५ वर्षाहून अधिक काळ त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे. देश विदेशात कार्यक्रमां बरोबरच ते पुण्यात बावधन येथे ‘स्वरकुल’ या त्यांच्या निवासी गुरुकुलामध्ये गुरू शिष्य परंपरेत प्राचीन अशा धृपद संगीताची विद्या देत आहेत. पं.उदय भवाळकर यांची एक निःस्वार्थ समर्पित ध्रुपद गुरु आणि उत्कृष्ट संगीतकार म्हणून जगभरातील रसिकांमध्ये ख्याती आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मिर्झापूर मालिकेने शिकवला विक्रांत मेस्सीला चांगलाच धडा; आता प्रत्येक सिनेमाची पटकथा पूर्ण वाचतो…