Monday, July 1, 2024

मुंबई महापौरांच्या विधानावर का संतापली कंगना?

२७ नोव्हेंबर रोजी बृहन्मुंबई महानगरपालिके विरोधात सुरु असलेल्या प्रकरणात कंगना रनौतला दिलासा मिळाला. त्यानंतर लगेचच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत आपली निराशा व्यक्त केली.

न्यूज वायर एजन्सी एएनआयने महापौरांचा केस आणि कंगनाबद्दल बोलणारा व्हिडिओ ट्विटर वर पोस्ट केला आहे. त्यात त्या म्हणाल्या, “हिमाचलमध्ये राहणारी अभिनेत्री येथे येऊन आमच्या मुंबईला पीओके म्हणते ही प्रत्येकाला आश्चर्य वाटवं अशीच गोष्ट आहे. अशा ‘दो टके के लोग’ (दोन टक्क्याच्या लोकांना) न्यायालयांना राजकीय स्पर्धेचे रिंगण बनवायचे आहे, हे चुकीचे आहे.”

 

महापौरांनाच्या प्रतिक्रियेवर व्यक्त होत कंगनाने तिच्या माजी बॉयफ्रेंड्स हृतिक रोशन आणि आदित्य पंचोली यांना ‘दयाळू आत्मा’ असे संबोधले. ती म्हणाली की महाराष्ट्र सरकारकडून कायदेशीर प्रकरण, गैरवर्तन, अपमान या सर्व गोष्टींना सामोरे गेल्यामुळे तिला असे वाटू लागले आहे.

“या काही महिन्यांत महाराष्ट्र सरकारकडून मला कायदेशीर खटले, शिवीगाळ, अपमान केलेला बघता बॉलिवूड माफिया आणि आदित्य पंचोली आणि हृतिक रोशनसारखे लोक दयाळू माणसांसारखे वाटतायत. माझ्या विषयी काय अडचणी आहेत ज्यामुळे मला वारंवार या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे.” अश्या शब्दात कंगनाने ट्विटरद्वारे आपला राग व्यक्त केला.

https://twitter.com/KanganaTeam/status/1332525605468954626?s=20

 

कंगनाने यापूर्वी असे म्हटले होते की पोलिस आणि महाराष्ट्र सरकार यांच्यासमवेत मुंबईत रहाणे पाकिस्तानच्या काश्मिरात (पीओके) राहण्या सारखे वाटते. अपेक्षेप्रमाणे ही टिप्पणी बर्‍याच जणांच्या पचनी पडली नव्हती. शहराचा अपमान केल्याबद्दल अनेकांनी तिला सोशल मीडियावर चांगलेच झाडले होते.

त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला ‘हरामखोर’ असे संबोधले होते. तसेच ‘तुम्ही शहरात कसे रहाल हे मी पाहू’ असे सांगून तिला धमकावले होते. कंगनाला लवकरच ‘वाय’ सुरक्षा मिळाली आणि ती हिमाचल प्रदेशच्या तिच्या गावी राहत असताना वांद्रे येथील तिचा बंगला तोडण्यात आला.

हे देखील वाचा