नवीन वर्ष सुरु होऊन एक महिनाही होत नाही तोपर्यंतच अनेक दुःखद बातम्यांचा सिलसिला सुरु झाला आहे. २०२० हे संपूर्ण वर्ष फक्त आणि फक्त वाईट बातम्या ऐकण्यातच संपले. आता २०२१ च्या पहिल्याच महिन्यात देखील अनेक वाईट बातम्या ऐकायला येत आहेत. नुकतीच एका कन्नड अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची बातमी आली आहे.
कन्नड अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक जयश्री रामय्या ही बंगळुरू येथे मृत अवस्थेत आढळून आली. जयश्रीच्या निधनामुळे संपूर्ण कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये दुःखाचे सावट पसरले आहेत. जयश्रीने मागच्या वर्षीच २४ जून २०२० मध्ये फेसबुकवर ती आत्महत्या करणार असल्याचे पोस्ट केले होते.
तिने तिच्या पोस्ट मध्ये लिहिले होते, “मी अलविदा म्हणत आहे, संपूर्ण जगाला आणि डिप्रेशनला गुडबाय.” तिची ही पोस्ट वाचल्यावर अनेकांनी तिला संपर्क साधला होता. त्यावेळी तिने लोकांच्या समाधानासाठी मी ठीक आणि सुखरूप असल्याची पुन्हा एक पोस्ट शेयर केली होती. मात्र ती डिप्रेशनमध्ये असल्याने तिच्यावर बंगळुरूच्या एका मानसोपचार केंद्रात उपचार देखील चालू होते. त्यावेळी तिला एका मोठ्या अभिनेत्याने काम मिळवून देण्याचे देखील आश्वासन दिले होते. तेव्हापासून ती हळूहळू या गंभीर नैराश्यातून बाहेर येत होती.
जयश्री कन्नड बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिला या शोमुळे भरपूर प्रसिद्धी देखील मिळाली मात्र काम मिळाले नाही. जयश्रीसोबत असणाऱ्या सर्व बिग बॉसच्या स्पर्धकांना कुठेना कुठे काम मिळत गेले पण जयश्री याला अपवाद राहिली. त्यामुळे तिच्या प्रचंड प्रमाणात नकारात्मकता आणि नैराश्य आले होते.
जयश्रीवर ज्या मानसोपचार केंद्रात उपचार चालू होते तिथेच तिने २५ जानेवारी सोमवार रोजी आत्महत्या केली. सोमवार सकाळपासून जयश्री फोन उचलत नव्हती, मेसेजेसलाही रिप्लाय देत नव्हती. म्हणून तिच्या नातेवाईकांनी केंद्रात संपर्क साधला असता, ती तिच्या रूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली. तिला त्वरित रुग्णालायत नेण्यात आले, मात्र ती त्याआधीच मृत झाली होती.










