मंडळी आपल्याकडे बॉलिवूड कलाकारांचे चाहते हे मोठ्या प्रमाणात असतात. इतके की काही तर त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी समजून तसं वागायला सुरुवात देखील करतात. अनेकांना बॉलिवूड स्टार्स हे अगदी अस्खलित इंग्रजी बोलताना दिसतात, त्यामुळे यांचं शिक्षणही खूप झालं असेल असं वाटत असतं. नाही यात थोडी फार सत्यता देखील आहे कारण अनेक बॉलिवूड स्टार्स हे इंजिनिअरिंग, डॉक्टर, असा अभ्यास करून मग अभिनयाकडे वळलेले असतात आणि आपल्याला ते यशस्वी देखील झालेले पाहायला मिळतात. परंतु काही मोठ-मोठे असे कलाकार आहेत जे आह अगदी बॉलिवूडचे सुपरस्टार्स आहेत त्यांचं शिक्षण जर आपण जाणून घ्याल तर अवाक व्हाल! कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी
कंगना रनौत
सध्या सतत कोणत्या ना कोणत्या वादात अडकणार हिमाचल प्रदेशची कन्या असलेल्या कंगना रनौतला नेहमीच अभ्यासामध्ये फारसा रस नव्हता. कायम तिला मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा होती, मात्र त्यामध्ये तिला कौटुंबिक सहकार्य मिळू शकलं नाही. जेव्हा कंगना बारावीत रसायनशास्त्राच्या परीक्षेत नापास झाली तेव्हा तिने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. शिक्षण मध्येच सोडल्यानंतर कंगना मॉडेलिंग करण्यासाठी घर सोडून दिल्लीला पळून गेली होती.
करिश्मा कपूर नव्वदीच्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूरने कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं आहे. १९८८ मध्ये आई-वडील विभक्त झाल्यानंतर करिश्माने तिच्या कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. १९९१ मध्ये आलेल्या ‘प्रेम कैदी’ चित्रपटातून करिश्माला मोठा ब्रेक मिळाला, त्यानंतर तिने एकामागून एक हिट चित्रपट दिले. शालेय शिक्षण संपल्यानंतर करिश्माने सोफिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला खरा पण करिअरमुळे तिला शिक्षण सोडावं लागलं.
कतरीना कैफ
कतरिना कैफचे पालक लहान वयातच विभक्त झाले. तीच्या आईने तिच्या सात भावंडांना एकटीने वाढवलं आहे. कतरिना हाँगकाँग, चीन, जपान, फ्रान्स, बेल्जियम, लंडन अशा बर्याच ठिकाणी राहिलेली आहे. शहर आणि देशातील वारंवार स्थलांतरित होत असल्याने कतरीनाला शाळेतून शिक्षण मिळू शकलं नाही. तिच्या आईने घरीच शिक्षकांच्या मदतीने सर्व भावंडांचा अभ्यास पूर्ण केला होता. कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी कतरिनाने लहान वयातच मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर तिला बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि आज कतरीना कुठे आहे हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही.
काजोल
बॉलिवूडची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या काजोलने आपले शालेय शिक्षण कधीच पूर्ण केलं नाही, तिचा प्रारंभिक अभ्यास पाचगणी येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाला होता. शाळेच्या काळात काजोलला बेखुदी या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी काजोल फक्त १६ वर्षांची होती. काजोल चित्रपटाला हो म्हणाली. तिने ठरवलं होतं की एकदा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर ती तिचा अभ्यास पूर्ण करेल, परंतु हे शक्य झालं नाही. काजोलला बेखुदी सिनेमानंतर अनेक बड्या चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या. त्यामुळे ती चित्रपटांमध्येच व्यस्त झाली.
अर्जुन कपूर
इश्कजादे चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अर्जुन कपूरला कधीच अभ्यासाची आवड नव्हती. अर्जुन उच्च माध्यमिक परीक्षेत नापास झाला होता, त्यानंतर त्याने पूर्णपणे अभ्यासाला रामराम ठोकला. अभ्यास सोडल्यानंतर अर्जुनने सहाय्यक दिग्दर्शक आणि सहाय्यक निर्माता म्हणून काम करण्यास सुरवात केली. अर्जुनने सलाम-ए-इश्क आणि काल हो ना हो यासारख्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.
सलमान खान
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, परंतु अभिनय कारकीर्दीमुळे त्याने महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडून दिलं. १९८८ मध्ये सलमानने बिवी हो तो ऐसी नावाच्या चित्रपटात सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यानंतर मैने प्यार किया या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून त्याने काम केलं.
आमिर खान
थ्री इडियट्समधील अभियंता आणि तारे जमीन पर चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारणार्या आमिर खानने महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावरच सोडलं. आमिरने नरसी मोनजी महाविद्यालयातून आपली १२ वी पूर्ण केली. त्याने अभियांत्रिकी करावी अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती, पण आमिर कुटुंबाविरूद्ध जाऊन नाट्यसंस्थेमध्ये सामील झाला. आमिरचा हा निर्णय त्याच्यासाठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी खूप फायदेशीर ठरला. आज उगाच काही आमिरला मि. परफेक्शनिस्ट म्हणत नाहीत. त्याच्या उत्कृष्ट कामामुळे त्याने हे विशेषणं कमावलं आहे.
श्रीदेवी
दाक्षिणात्य चित्रपटात बालकलाकार म्हणून पदार्पण केलेल्या आणि मग नंतर बॉलिवूड गाजवलेल्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना कधीच अभ्यासाची आवड नव्हती. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. नंतर, शालेय शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी चित्रपटांत प्रवेश केला आणि यामुळे त्यांचं माध्यमिक शिक्षण हे अर्ध्यातच सुटलं. आणि तरीही श्रीदेवी या बॉलीवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार होत्या.
अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने दहावीनंतरच अभ्यासापासून अंतर राखलं. पुढील शिक्षणासाठी त्याने मुंबईच्या खालसा महाविद्यालयात प्रवेश घेतला होता पण नंतर मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेण्यासाठी हाँगकाँगला गेला. अक्षय यानंतर भारतात परतला आणि त्याने मार्शल आर्ट प्रशिक्षक आणि शेफ म्हणून काम केलं. यानंतर अक्षय बॉलिवूडमध्ये आला आणि त्याने काय इतिहास घडवला हे आपल्या सर्वांसमक्ष आहे.