Thursday, July 18, 2024

प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे दुःखद निधन

कला विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू (Pandit Birju Maharaj) महाराज यांचे दुःखद निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज यांनी रविवार-सोमवारच्या (१७ जानेवारी) मध्यरात्री दिल्लीच्या साकेत रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पंडित बिरजू महाराज यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी याबाबत माहिती दिलीये…

बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनऊ येथे झाला. लखनऊ घराण्यात जन्मलेल्या बिरजू महाराज यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा असे होते. कथ्थक करण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराजांपूर्वी त्यांचे वडील आणि गुरू अच्छन महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील कथ्थकचे प्रसिद्ध नर्तक होते.

अदनान सामीने वाहिली श्रद्धांजली
निधनाची माहिती मिळताच, अदनान सामीनेही (Adnan Sami) पोस्ट शेअर करत बिरजू महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, “महान कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज जी यांच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले. आज आपण कलेच्या क्षेत्रातील एक अनोखी संस्था गमावली आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेने अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे.”

१९८३ साली मिळाला पद्मविभूषण पुरस्कार
बिरजू महाराज यांना १९८३ मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांना या पद्म पुरस्काराशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बिरजू महाराज यांना बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेटही देण्यात आली.

साल २०१२ मध्ये ‘विश्वरूपम’ या चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्याच वेळी, २०१६ मध्ये, ‘बाजीराव मस्तानी’च्या ‘मोहे रंग दो लाल’ गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला आहे. बिरजू महाराज यांनी माधुरी दीक्षित, दीपिका पदुकोण यांसारख्या अनेक अभिनेत्रींचे नृत्यदिग्दर्शन केले.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा