बॉलिवूडमध्ये आपण अनेकदा पाहतो की एखादा चित्रपट करण्यास एखादा बडा कलाकार नकार देतो. त्यानंतर तो चित्रपट एखाद्या नव्या किंवा दुसऱ्या कलाकाराला घेऊन केला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालतो. कोटींमध्ये कमाई करतो. मग माध्यमांमध्ये चित्रपट नाकारलेल्या बड्या कलाकाराचा निर्णय कसा चुकीचा होता यावर चर्चा होतात. आहे की नाही सगळी गंमत! अशा गंमती जमती बॉलिवूडमध्ये नेहमीच घडत असतात. शेवटी एखाद्याच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते त्याच्याकडून कुणीच हिसकावून घेऊ शकत नाही.
असंच काहीसं आता पुन्हा एकदा झालं आहे. एका नव्या आगामी सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका अभिनेत्री कतरीनाला ऑफर झाली होती परंतु तिने ही ऑफर नाकारली आणि आता त्या भूमिकेसाठी ही प्रसिद्ध अभिनेत्री फायनल झाली आहे. कोण आहे ही अभिनेत्री आणि नेमकं काय प्रकरण होतं हे जाणून घेऊयात.
विकास बहलचा ‘डेडली’ हा चित्रपट यावर्षी बर्याचदा चर्चांमध्ये राहिला. या वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफ या दोन नावांसोबत जाहीर झाला होता. परंतु कतरिनाने या चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर अशी बातमी समोर आली की, कतरिनाऐवजी अभिनेत्री क्रीती सॅनॉन या चित्रपटात दिसणार आहे. परंतु, आता या सर्व अफवाच ठरल्या आहेत कारण या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुलगी म्हणून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मीका मंदानाची निवड करण्यात आली आहे आणि तिने सुद्धा हा चित्रपट करण्यास होकार दिला आहे.
हा चित्रपट विकास बहल दिग्दर्शित करणार असून एका आठवड्यात रश्मिकाने साइन केलेला हा दुसरा हिंदी चित्रपट आहे. ‘डेडली’ चित्रपटाची चर्चा बर्याच दिवसांपासून सुरू आहे, पण आता निर्मात्यांनी ठरवलं आहे की, ते पुढील वर्षी मार्चपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करतील. एकदा चित्रपटाचे पहिलं वेळापत्रक सुरू झालं की चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण झाल्यानंतरच ते संपेल. या चित्रपटाची कथा एका वडील आणि मुलीच्या नात्याची असेल असं सांगितलं जात आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना व्यतिरिक्त नीना गुप्ताही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.
मागच्याच बुधवारी एक बातमी आली की रश्मिकाने हिंदी चित्रपटात पाऊल ठेवण्याचा विचार केला आहे. शंतनू बागची दिग्दर्शित आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. प्रसिद्ध निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्या निर्मितीत बनणार असलेला हा चित्रपट ७० च्या दशकातल्या एका वास्तविक घटनेवर आधारित असणार आहे. या गुप्तहेर कथेत देशातील गुप्तचर संस्था रॉचा एजंट पाकिस्तानात जाऊन एक गुप्त मिशन राबवेल. या चित्रपटात सिद्धार्थ याच रॉ एजंटची भूमिका साकारणार आहे.
हिंदी चित्रपटांत पदार्पण करण्यावर रश्मिकाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘वेगवेगळ्या भाषा बोलणार्या प्रेक्षकांकडून मला इतके प्रेम मिळवण्याचा बहुमान मिळाला आहे. एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी नेहमी चित्रपटाची कथा महत्त्वाची असते, भाषा नव्हे. निर्मात्यांनी मला हिंदी चित्रपटाची ऑफर दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. ‘मिशन मजनू’ हा चित्रपट खूपच सुंदर लिहिला गेला आहे. मी एका अशा टीमचा भाग होणार आहे जी एका उत्कृष्ट कथेवर काम करणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटांनंतर मी हिंदी चित्रपटसृष्टीत माझा प्रवास सुरू करण्यास आणि नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप उत्साही आहे. रश्मिका ‘डियर कॉम्रेड’, ‘गीता गोविंदम’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. इतकंच नाही तर तिच्या एक्सप्रेशन्सचे लाखो तरुण चाहते आहेत. म्हणूनच रश्मीका ही आपल्या देशाचं नॅशनल क्रश आहे असं गुगल आपल्याला सांगतं आणि जे बऱ्यापैकी सत्यदेखील आहे.