Friday, March 29, 2024

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ जबरदस्त गाणेही झाले तयार, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील!, वक्के हाय सगळ’ हे वाक्य सध्या महाराष्टात सर्वत्र ऐकायला मिळत आहे. सोशल मीडियावरही आणि राजकीय वर्तुळातही सध्या या वाक्यांचीच चर्चा रंगली आहे. शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमधील ही वाक्ये असल्याचा दावा केला जात आहे. ज्यामध्ये शहाजी बापू पाटील यांनी गुवाहाटीच्या हॉटेलचे रांगड्या भाषेत कौतुक केलेले दिसत आहे. हे रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आला होता. इतकेच नव्हेतर आता यावर एक गाणेही तयार झाले असून सध्या हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षातीलच काही आमदारांनी बंडखोरी केली असल्याने महाविकास आघाडी टिकणार की कोसळणार याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बंडखोरी केलेले आमदार सध्या गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये वास्तव्यास असून काही दिवसांपूर्वीच यापैकीच एका आमदाराचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. हे कॉल रेकॉर्डिंग सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे असल्याचा दावा केला जात होता.

यामध्ये हॉटेलचे वर्णन करताना त्यांनी काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, वक्की मधी हाय असे अस्सल रांगडी शब्द वापरले होते. हे रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर सोशल  मीडियावर मिम्सचा महापूर पाहायला मिळाला होता. आता त्यावर एक गाणेही तयार झाले आहे.  सोशल मीडियावर हे गाणे सध्या चांगलेच व्हायरल होत आहे ज्यामध्ये या रेकॉर्डिंगसोबत धमाकेदार संगीत लावल्याचे दिसत आहे. युट्यूबर शंतनू पोळे या तरुणाने हे गाणे तयार केले असून अल्पावधीतच  हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल गाण्याला शेअर करत नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे देखील वाचा