Friday, February 3, 2023

KGF Chapter 2 | ‘केजीएफ २’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, यशने जबरदस्त ऍक्शनने जिंकले मनं

साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर १’ च्या यशानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता लक्षात घेऊन निर्मात्यांनी याआधीच याचे अनेक पोस्टर्स प्रर्दशित केले आहेत. या क्रमाने आता प्रेक्षक त्याच्या ट्रेलरसाठी आतुर झाले आहेत. अशा परिस्थितीत आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. निर्मात्यांनी रविवारी (२७ मार्च) चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

‘केजीएफ चॅप्टर २’ च्या ट्रेलरबद्दल माहिती देताना, निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ‘केजीएफ चॅप्टर २’ चा ट्रेलर २७ मार्च रोजी संध्याकाळी ६.४० वाजता प्रदर्शित होईल. साऊथचा अभिनेता यशचा दमदार अभिनय या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. यासोबतच बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि अभिनेता संजय दत्त देखील शानदार पद्धतीने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसले.

एका लाँच इव्हेंटमध्ये चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरही दिसला. या कार्यक्रमात चित्रपटाबद्दल बोलताना त्याने कन्नड चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमारचीही आठवण काढली. यासोबतच कन्नड भाषेत संध्याकाळी ६.४० वाजता चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यानंतर चित्रपटाचा ट्रेलर हिंदी आणि नंतर इतर भाषांमध्येही लाँच करण्यात आला. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये, सुपरस्टार यशने पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त ऍक्शनने सर्वांची मने जिंकली. त्याचबरोबर अभिनेत्री रवीना टंडन आणि अभिनेता संजय दत्त देखील ट्रेलरमध्ये फुल फॉर्ममध्ये दिसले.

कन्नड भाषेत बनलेल्या या चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचवेळी, त्याच्या दुसऱ्या भागाबद्दल सांगायचे झाले, तर पहिल्या भागाप्रमाणेच ‘केजीएफ चॅप्टर २’ देखील हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. हा चित्रपट यावर्षी १४ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. झी तमिळ, झी तेलुगू, झी केरलम आणि झी कन्नडने चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क विकत घेतले आहेत.

‘केजीएफ १’ प्रमाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात यश आणि श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि अभिनेता संजय दत्त देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात संजय खलनायक अधीराची भूमिका साकारणार आहे. कोरोनामुळे चित्रपटाची प्रदर्शन डेट अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली आहे.

हे देखील वाचा