Monday, July 1, 2024

राजकारणी ते मीमस्टार, जाणून घ्या अमिर लियाकत यांचा जीवनप्रवास

अमिर लियाकत हे नाव तुमच्यासाठी नवीन असेल. पण, त्यांचा चेहरा मात्र तुम्ही कधीतरी सोशल मीडियावर नक्कीच पाहिला असेल. गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर मीम्स सारखेच व्हायरल होत असतात. या मीम्समुळे अनेक जण तर सेलिब्रेटीही झाले. त्यातीलच एक व्यक्ती म्हणजे अमिर लियाकत हुसेन. वाह वाह वाह असं म्हणणाऱ्या एका व्यक्तीचे गीफ तुम्ही पाहिले असेलच, तेच अमिर लियाकत हुसेन, ९ जून २०२२ रोजी वयाच्या ४९ व्या वर्षीच काळाच्या पडद्याआड गेले. मीममुळे सर्वांना माहित झालेले अमिर लियाकत यांचे व्यक्तीमत्व केवळ तेवढ्यापुरतेच मर्यादीत नव्हते, तर ते पाकिस्तानमधील जानामाना चेहरा होते. त्याचमुळे त्यांच्या निधनानंतर पाकिस्तानात शोककळा पसरली आहे. तर कसा होता अमिर लियाकत यांचा जीवनप्रवास जाणून घेऊ…

कराचीमध्ये ५ जुलै १९७२ रोजी अमिर लियाकत यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल शेख लियाकत हुसेन हे राजकारणी होते, तर आई मेहमुदा सुलताना कॉलमनिस्ट होत्या. त्यामुळे राजकारणाचे वातावरण अमिर लियाकत यांनी लहानपणापासूनच पाहिलेले, त्यामुळे पुढे जाऊन ते देखील राजकारणातच सक्रिय झाले… ते माजी खासदार होते. त्यांनी २००२ ते २००७ दरम्यान धार्मिक व्यवहार मंत्री म्हणूनही काम पाहिलं. अमिर लियाकत २०१८ साली देखील इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आले होते. असे असले तरी राजकारणी कारकिर्दीतील गोष्टींमुळे असो किंवा ते टीव्ही क्षेत्रामुळे असो किंवा त्यांच्या विधानांमुळे, ते सातत्याने वादात अडकले.

त्यांच्या कारकिर्दीतील चर्चेत राहिलेली वादग्रस्त घटना म्हणजे, त्यांनी शिक्षणाबद्दल दाखवलेल्या खोट्या पदव्या. २००२ मध्ये संसदेची निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी बॅचलर डिग्री कंपलसरी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अनेकदा शिक्षणाबद्दल खोटं बोलल्याचे उघड झाले. त्यांनी कधी एमबीबीएस केल्याचे सांगितले, कधी पीएचडी केल्याचे सांगितले. तसेच बीए केल्याचेही सांगितले. पण त्यांचे सर्टिफिकेट खोटे असल्याचे नंतर समोर आले होते.

एकाबाजूने राजकारणातील करियर दुसऱ्या बाजूनी टीव्हीमध्येही त्यांचे करियर जोरात सुरू होते. त्यांनी रेडिओपासून सुरुवात केल्यानंतर पाकिस्तान टेलिव्हिजन कार्पोरेशनमध्ये काम केले, पण त्यांना काही काळातच तिथून हकलण्यात आले. त्यांनतर त्यांनी जिओ टीव्ही जॉईन केलं. त्यात त्यांनी अलीम ऑनलाईन हा धार्मिक प्रोग्राम होस्ट केला. यानंतर जिओ टीव्ही सोडल्यानंतर त्यांनी एआरवाय डिजिटल नेटवर्कमध्ये मॅनेजिंग डायरेक्ट आणि एक्झिक्यूटीव्ह डायरेक्टर म्हणून काम केले. तिथेही त्यांनी धार्मिक प्रोग्राम होस्ट केला. ते टीव्ही करियरमध्ये बऱ्याचदा धार्मिक प्रोग्रामच अधिक होस्ट करताना दिसले. यादरम्यान ते वादात अडकले ते म्हणजे लहान मुलांना ते टीव्ही शो दरम्यान अपत्यहीन जोडप्याला दत्तक देत असत, त्यामुळे. याशिवाय त्यांच्या टीव्ही शोमध्ये गैरव्यवहार झाल्याच्याही घटना उघडकीस आल्या होत्या. त्यांनी आयोजित केलेल्या अहमदी मुस्लिमांबद्दलच्या एका शो मुळेतर मोठा बाद झाला होता. या शोमध्ये काही तज्ञांनी म्हटले होते की अहमदी मुस्लिमांशी संबंध ठेवणाऱ्यांची हत्या करायला हवी. या व्यक्तव्यानंतर लगेचच २४ तासात अहमदी समुदायाच्या २ प्रमुख सदस्यांची हत्या झाली होती.

राजकारण आणि टीव्ही यांमुळे सातत्याने चर्चेत येणाऱ्या अमिर लियाकत यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच चोखळले गेले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ३ वेळा लग्न केलं. त्यांची पहिली पत्नी होती सय्यदा बुशरा इक्बाल. त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा २०१८ मध्ये सय्यद तौबा अमिर हिच्याशी लग्न केलं. या दोघींबरोबरही त्यांचा घटस्पोट झाला. त्याचवेळ याचवर्षी त्यांनी तिसऱ्यांदाही लग्न केले. त्यांचं तिसरं लग्न कट्ट्यावरील चर्चेचा विषय ठरलं. कारण त्यांनी ज्या दानिया शाहबरोबर लग्न केले होते, ती केवळ १८ वर्षांची आहे. विशेष गोष्ट अशी की लग्नानंतर तीनच महिन्यात तिने घटस्पोटासाठी अर्ज केला. यावेळी तिने काही आरोपही केले. यानंतर अमिर लियाकत यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आणि आरोप खोटे असल्याचे म्हटले. या प्रकरणामुळे ते निराश झाल्याचेही म्हटले जात होते. त्यानंतर आता आचानक कराचीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दरम्यान सध्यातरी त्यांच्या मृत्यूबाबत तपास सुरू आहे.

इतकं सगळं असताना एक राजकारणी, टीव्ही शो होस्ट म्हणून प्रसिद्ध झालेल्या आणि तितक्याच वादग्रस्त गोष्टींमुळे पाकिस्तानात चर्चेत आलेले अमिर लियाकत जगभरात पोहचले ते त्यांच्या मीम्समुळेच. त्यांच्या टीव्ही शोवरील हसण्याचे आणि त्यांच्या काही कृत्यांवरून अनेक मीम्स तयार झाले, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरही होत असतात. अनेकांनी हे मीम्स वापरलेही असतील, पण ते हेच अमिर लियाकत आहेत हे अनेकांना माहितही नसेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा