Thursday, April 25, 2024

फिरोज खान आणि विनोद खन्ना यांची होती हेवा वाटणारी मैत्री, दोघांच्या मृत्यूचे कारण आणि तारीख आहे सारखीच

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आणि त्यांच्या यारीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. बॉलिवूड कलाकारांमधील मैत्री नेहमीच वाखाणण्याजोगी आणि हेवा वाटावा अशी असते. आज बॉलिवूडमध्ये पाहिले तर अनेक कलाकार हे त्यांच्या मैत्रीसाठी आणि मैत्रीच्या किस्स्यांसाठी ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये मैत्री हे नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर येते ते भाईजान सलमान खानचे नाव. सलमान आणि त्याच्या मैत्रीचे अनेक किस्से बॉलिवूडमध्ये, मीडियामध्ये आणि त्याच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय असतात. मात्र सलमान खानच्या आधी बॉलिवूडमध्ये एका मैत्रीची सर्वात आधी आठवण काढली जाते आणि ती मैत्री म्हणजे दिवंगत अभिनेते विनोद खन्ना आणि फिरोज खान. मैत्रीमध्ये नेहमीच सुख दुःख वाटून घेतली जातात, मात्र या दोघांच्या मैत्रीत तर त्यांनी त्यांच्या मृत्यूची तारीखही वाटूनच घेतली असे म्हणावे लागेल.

विनोद खन्ना आणि फिरोज खान यांची केमिस्ट्री पडद्यामागेच नाही तर पड्डीवरही तितक्याच प्रभावी पद्धतीने उठून आली. १९७६ साली प्रदर्शित झालेला ‘शंकर शंभू’ फिरोज खान आणि विनोद खन्ना यांनी सोबत काम केले होते. या दोघांची जोडी प्रेक्षकांना तुफान आवडली. १९८० साली आलेल्या ‘कुर्बानी’ सिनेमात ते पुन्हा सोबत दिसले. या चित्रपटाचे दिग्दर्शन फिरोज खान यांनीच केले होते. हा सिनेमा तुफान गाजला. त्याकाळात या सिनेमाने १२ कोटींची कमाई केली होती. एका माहितीनुसार जेव्हा विनोद खन्ना या क्षेत्रात यशाच्या शिखरावर होते तेव्हा ते ही इंडस्ट्रीसोडून ओशो आश्रमात निघून गेले. ते परत आल्यानंतर त्यांना पुन्हा या क्षेत्रात पदार्पण करायचे होते, त्यावेळी फिरोज खान यांनी त्यांना मदत केली आणि ‘दयावान’ सिनेमा बनवला. १९८८ साली आलेल्या या सिनेमात ते पुन्हा सोबत दिसले. विनोद खन्ना यांनी खलनायक साकारत त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली आणि एक नायक म्हणून ते हिट झाले तर फिरोज खान यांनी मोजक्या मात्र लक्षवेधी आणि अविस्मरणीय चित्रपटांमध्ये काम करत ओळख निर्माण केली. फिरोज खान हे प्रत्येक भूमिकेत हिटच राहिले, मग ते नायक असो किंवा खलनायक.

फिरोज खान हे शेवटचे ‘वेलकम’ सिनेमात दिसले होते. फिरोज खान आणि विनोद खन्ना या दोघांच्या मृत्यचे कारण जवळपास एकच होते. दोघांचाही मृत्यू कॅन्सरमुळे झाला. फिरोज खान यांना लंग कॅन्सर होता तर विनोद खन्ना यांना ब्लड कॅन्सर होता. दोघांच्या मृत्यची तारीखही एकच आहे. फिरोज खान यांचे २७ एप्रिल २००९ ला निधन झाले तर विनोद खन्ना यांचे २७ एप्रिल २०१७ ला निधन झाले.

हेही वाचा-
…म्हणून भाऊ कदमने अशोक मामांच्या पायावर घातलं लोटांगण; व्हिडिओ एकदा पाहाच
‘सिंगल’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; प्राजक्ताचा घायाळ करणारा लूक व्हायरल

हे देखील वाचा