हिंदी चित्रपटसृष्टीला १०० पेक्षा अधिक वर्ष झाली आहेत. या एवढ्या मोठ्या कालखंडात अनेक मोठमोठे आणि अतिशय प्रतिभावान कलाकार होऊन गेले. या कलाकारांनी त्यांच्या सकस अभिनयाने प्रेक्षकांचे अनेक वर्ष मनोरंजन केले. यातलेच महत्त्वाचे नाव म्हणजे ‘प्राण’ होय. प्राण यांच्या उल्लेखाशिवाय संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास हा अपूर्णच आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
प्राण यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आजही प्राण साहेब आणि त्यांचा दमदार अभिनय लोकांना नक्कीच आठवतो. अभिनेता होण्यासाठी आलेल्या प्राण यांनी खलनायक साकारत तुफान लोकप्रियता मिळवली. त्यांच्यासारखा कलाकार, खलनायक हिंदी सिनेसृष्टीला लाभला हे हिंदी सिनेमाचे भाग्य म्हणावे लागेल. साधारण लूक्स आणि भारदस्त आवाजाच्या जोरावर त्यांनी त्यांची वेगळी आणि हटके ओळख तयार केली.
प्राण यांचा जन्म १२ फेब्रुवारी, १९२० रोजी दिल्लीतल्या लाला केवळ कृष्ण सिकंद या सरकारी ठेकेदारांच्या घरी झाला. प्राण यांनी जवळपास सहा दशकं चित्रपटांमध्ये काम केले. यादरम्यान त्यांनी सुमारे ३५० चित्रपट केले. त्यांनी बहुतकरून सिनेमांमध्ये फक्त खलनायकच साकारला. त्यामुळेच त्यांना ‘व्हिलन ऑफ द मिलेनियम’ म्हटले जायचे, किंबहुना अजूनही म्हटले जाते. त्यांच्या अभिनयाला विविध पैलू होते, त्यांची संवाद फेकीची स्टाईल त्यांची ओळख ठरली.
प्राण अभिनयासोबतच अभ्यासातही हुशार होते. गणितामध्ये तर त्यांचा विशेष हातखंडा होता. प्राण यांचे मोठे होऊन एक फोटोग्राफर होण्याचे स्वप्न होते. हेच स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यांनी दिल्लीतल्या ‘ए दास & कंपनी’मध्ये अप्रेंटिस म्हणून देखीलसुद्धा काम केले. पुढे १९४० साली एकदा प्राण एका पानाच्या दुकानावर उभे असताना लेखक मोहम्मद वली यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी पहिल्याच नजरेत त्यांच्या ‘यमला जट’ या पंजाबी सिनेमासाठी त्यांना साईन केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
प्राण यांनी १९४२ ते १९४६ या चार वर्षात २२ सिनेमांमध्ये काम केले. पुढे १९४७ मध्ये भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर प्राण भारतात आले आणि इथे सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. इथेच त्यांना खरी ओळख मिळाली आणि एक खलनायक म्हणून ते नावारूपास आले. १९४२ साली त्यांनी ‘खानदान’ हा पहिला हिंदी सिनेमा करत हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. या सिनेमात नूरजहां त्यांची अभिनेत्री होती, तर दलसुख पांचोली या सिनेमाचे दिग्दर्शक होते. हा सिनेमा मिळण्यापूर्वी काही महिने प्राण यांनी घर चालवण्यासाठी मरीन ड्राईव्ह जवळच्या एका हॉटेलमध्ये देखील काम केले होते.
प्राण यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः त्यांची चीड आणायला भाग पाडले. लोकं त्यांचा इतका तिरस्कार करायचे की, आपल्या मुलांचे प्राण नाव ठेवणे देखील बंद झाले होते. खलनायकाला नायक इतकेच महत्त्व प्राण यांनीच मिळवून दिले. त्यांनी सिनेमाचा अर्थ बदलून टाकला होता. मुख्य म्हणजे अमिताभ बच्चन यांना मोठे करण्यातही प्राण यांचा मोठा हात होता. अमिताभ यांच्या करियरमधील मैलाचा दगड ठरलेल्या ‘जंजीर’ सिनेमासाठी प्राण यांनीच दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना अमिताभ बच्चन यांचे नाव सुचवले होते. याच सिनेमाने अमिताभ यांच्या करियरला वेग आणि कलाटणी मिळाली. ६० आणि ७० च्या दशकात प्राण हे नायकापेक्षा जास्त फी घायचे. त्याकाळी प्राण ५ ते १० लाख रुपये एवढी फी एका सिनेमासाठी घ्यायचे. ही फी त्याकाळी फक्त राजेश खन्ना आणि शशी कपूर यांनाच मिळत होती.
प्राण हे फक्त अभिनयापुरतेच मर्यादित नव्हते त्यांना खेळातही प्रचंड आवड होती. ५० च्या दशकात प्राण यांच्याकडे त्यांची स्वतःची फुटबॉल टीम सुद्धा होती. प्राण आपल्या ६० वर्षांच्या करिअरमध्ये खूप सुखी आणि संतुष्ट होते. ते अनेकदा मुलाखतींमध्ये सांगायचे की, जर खरंच पुढचा जन्म मला मिळाला, तर पुढच्या जन्मी मला प्राणच व्हायला नक्की आवडेल. प्राण यांनी त्यांच्या करिअरमध्ये ‘मधुमति’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘उपकार’, ‘शहीद’, ‘पूरब और पश्चिम’, ‘राम और श्याम’, ‘जंजीर’, ‘डॉन’, ‘अमर अकबर एंथनी’, ‘कश्मीर की कली’, ‘खानदान’, ‘औरत’, ‘बड़ी बहन’, ‘हाफ टिकट’ अशा अनेक सिनेमांमध्ये दर्जेदार काम केले.
प्राण यांना त्यांच्या करिअरमध्ये असंख्य मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २००१ साली हिंदी सिनेमात त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार आणि याचवर्षी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते. प्राण यांनी १२ जुलै, २०१३ रोजी वयाच्या ९३ वर्षी या जगाचा निरोप घेतला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










