Saturday, June 29, 2024

‘रामायण’मध्ये ‘मंथरा’ बनण्यापूर्वी ‘या’ सर्वोत्तम भूमिका साकारत ललिता पवार यांनी गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य, टाका एक नजर

पडद्यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिमेसाठी ओळखल्या जाणार्‍या अभिनेत्रींमध्ये ‘ललिता पवार‘ यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. त्यांनी आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. ललिता पवार यांचा जन्म १८ एप्रिल, १९१६ रोजी नाशिक येथे झाला होता. त्यांचे खरे नाव अंबा होते. बाल कलाकार म्हणून ललिता यांनी वयाच्या नवव्या वर्षी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ‘राजा हरिश्चंद्र’ (१९२८) हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

सन १९४२ च्या ‘जंग-ए-आझादी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये, प्रसिद्ध अभिनेता भगवान दादाने ललिता यांना इतक्या जोरात चापट मारली की, त्या जमिनीवर पडल्या. त्यांच्या शरीराच्या उजव्या भागाला अर्धांगवायूही झाला. या घटनेनंतर ललिता यांना नायिका म्हणून कधीच काम मिळाले नाही. यामुळे त्यांनी चित्रपटात सासू आणि आईची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. २४ फेब्रुवारी, १९९८ रोजी जगाला निरोप देणाऱ्या ललिता यांनी, सुमारे ७०० चित्रपटांमध्ये काम केले. चला तर आज आपण त्यांच्या काही सर्वोत्कृष्ट पात्रांबद्दल जाणून घेऊया.

चित्रपट- श्री ४२० (१९५५)
व्यक्तिरेखा- गंगा माई
‘श्री ४२०’ हा चित्रपट राज कपूर यांनी दिग्दर्शित व निर्मित केलेला आहे. या चित्रपटात नर्गिसही मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. यात ललिता पवार यांनी ‘गंगा माई’ची भूमिका केली होती. श्री ४२० हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

चित्रपट- मिस्टर एँड मिसेस ५५ (१९५५)
व्यक्तीरेखा- सीता देवी
‘मिस्टर एँड मिसेस ५५’ या चित्रपटात ललिता यांनी मधुबालाच्या काकू ‘सीता देवी’ची भूमिका साकारली होती. यात त्यांचे हुशार पात्र सिनेमात अनेक रंजक ट्विस्ट्स घेऊन येताना दिसते.

चित्रपट- अनाडी (१९५९)
व्यक्तीरेखा- मिसेस डीसा
‘अनाडी’ हा चित्रपट १९५९ या वर्षातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात ललिता पवार यांनी ‘श्रीमती डीसा’ची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना आजही हे पात्र लक्षात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी केले होते.

चित्रपट- सुजाता (१९५९)
व्यक्तीरेखा- गिरीबाला
‘सुजाता’ हा दिग्दर्शक बिमल रॉय यांचा चित्रपट आहे. या चित्रपटात सुनील दत्त आणि नूतन मुख्य भूमिकेत होते. सलोचना, ललिता पवार आणि शशिकला यांनी यात सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट बंगाली लघुकथेवर आधारित आहे. हा चित्रपट देशातील प्रचलित जातिव्यवस्थावर निशाणा साधताना दिसला.

चित्रपट- हम दोनो (१९६१)
व्यक्तीरेखा- मेजरची आई
‘हम दोनो’ या चित्रपटात देव आनंद दुहेरी भूमिकेत आहेत. एकीकडे त्यांनी मेजर मनोहर लाल वर्माची भूमिका साकारली, तर दुसरीकडे कॅप्टन आनंदची भूमिकाही त्यांनीच साकारली होती. ललिता पवार या मेजर मनोहर लाल वर्माच्या आईच्या भूमिकेत होत्या. तसेच, हा चित्रपट दुसर्‍या महायुद्धातील आहे.

चित्रपट- जंगली (१९६१)
व्यक्तीरेखा- चंद्रशेखरची आई
‘जंगली’ या चित्रपटात ललिता पवार चंद्रशेखर बनलेल्या शम्मी कपूर यांच्या आईच्या भूमिकेत होत्या. यात त्यांचा कठोर स्वभाव पाहायला मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध मुखर्जी यांनी केले आहे.

चित्रपट- प्रोफेसर (१९६२)
व्यक्तीरेखा- सीता देवी वर्मा
‘प्रोफेसर’ ललिता पवार यांनी या चित्रपटात ‘सीता देवी वर्मा’ची भूमिका साकारली आहे, जी दार्जिलिंगमध्ये राहत असते. यात त्या खूपच कठोर स्त्रीच्या भूमिकेत दिसल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन लेख टंडन यांनी केले होते.

चित्रपट- खानदान (१९६६)
व्यक्तीरेखा- भगवंती जे. लाल
ए. भीमसिंग दिग्दर्शित ‘खानदान’ या चित्रपटात सुनील दत्त, नूतन, प्राण, ओम प्रकाश, ललिता पवार, हेलन आणि मुमताज हे प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात ललिता पवार ओम प्रकाश यांच्या पत्नी आहेत.

चित्रपट- फूल और पत्थर (१९६६)
व्यक्तीरेखा- श्रीमती जीवन राम
‘फूल और पत्थर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती ओ. पी. रलहन यांनी केले होते. मीना कुमारी, धर्मेंद्र, शशिकला आणि ओ. पी. रलहन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात ललिता पवार यांनी श्रीमती जीवन रामची भूमिका साकारली होती. या चित्रपटाद्वारेच धर्मेंद्र एका रात्रीत स्टार बनले.

चित्रपट- रामायण (१९८८)
व्यक्तीरेखा- मंथरा
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मध्ये, ललिता पवार यांनी साकारलेली ‘मंथरा’ची भूमिका कोणीच विसरू शकत नाही. ललिता पवार यांचा हा पहिला टीव्ही शो होता आणि त्यांनी शोमध्ये बरीच प्रसिद्धी मिळविली. आजही रामायणाची चर्चा होत असताना ललिता पवार यांचे नाव आवर्जुन घेतले जाते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाला अचानक ठोकला रामराम, पोस्ट शेअर करत दिली माहिती
अत्यंत वादग्रस्त : ‘स्वरा भास्कर जर हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार…’, अयोद्धेतील महंताच्या विधानाने खळबळ

हे देखील वाचा