मागच्या वर्षी अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित ‘बेल बॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाबाबत समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया देत कलाकारांच्या अभिनयाचे कौतुकही केले होते. या चित्रपटात मिस युनिव्हर्स लारा दत्ता देखील एका हटके आणि खास भूमिकेत दिसत होती. यात तिचा लूक असा होता की, पाहताक्षणी तिला ओळखणेही सर्वाना अवघड झाले होते. याआधी लाराला अनेकवेळा आपण ग्लॅमरस अंदाजात पाहिले आहे. परंतु या चित्रपटात तिने भारताच्या माजी पंत्रप्रधान इंदिरा गांधी यांचे पात्र निभावले होते. लाराला या रोलसाठी जेव्हा अक्षय कुमारने ऑफर दिली तेव्हा ती हैराण झाली होती.
लाराने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे वडील एअरफोर्समध्ये विंग कंपाउंडर होते. एवढंच नाही तर तिचे वडील इंदिरा गांधींचे वैयक्तिक पायलट देखील होते. त्यामुळे तिला हे पात्र निभावणे खूप सोपे झाले. यासोबत ही भूमिका निभावण्यासाठी मेकअप देखील महत्वाचा होता. लाराने सांगितले की, “या भूमिकेसाठी आवश्यक असणारा प्रोस्थेटिक मेकअप विक्रम गायकवाड यांनी केला होता. त्यांनी माझा चेहरा मोल्ड करून प्रोस्थेटिक बनवला. जेव्हा हे सगळं झालं, तेव्हा मी हैराण झाले होते. मी आरशात पाहून स्वतःला ओळखू शकत नव्हते.”
लाराने सांगितले की, इंदिरा गांधी यांच्यासारखे हावभाव करण्यासाठी तिला त्यांच्या अनेक मुलाखती पाहाव्या लागल्या. ती म्हणाली की, “माझे वडील इंदिरा गांधी यांचे वैयक्तिक पायलट होते. त्यामुळे त्यांच्याबाबत अनेक गोष्टी मी लहानपणापासून ऐकल्या होत्या. बाबांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींचा मला फायदा झाला. एका फौजीची मुलगी असल्याने देशभक्ती माझ्या रक्तातच आहे. आम्ही नेहमी हेच शिकलो आहोत की, आपल्या मातृभूमीपेक्षा जास्त मोठं आणि महत्वाचं काही नाहीये. माझ्या बाबांनी देशासाठी ३ युद्ध लढली आहेत.”
लाराने सांगितले की, अक्षय कुमारने जेव्हा तिला या रोलबाबत विचारले तेव्हा ती खूप हैराण झाली होती. ती म्हणाली की, “मी अक्षयला म्हटले होते की, माझ्यात आणि इंदिरा गांधी यांच्यात काहीच समानता नाहीये. परंतु त्याला माझ्यावर विश्वास होता.” जेव्हा पहिल्यांदा लाराचा लूक बाहेर आला तेव्हा तिला कोणीच ओळखू शकले नाही. तिचे नाव जाहीर करून देखील लोकांचा इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत लाराच आहे यावर विश्वास नव्हता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा