भारतीय संगीत जगतात सर्वोच्च स्थानी ज्या काही व्यक्ती विराजमान आहेत त्यापैकी एक नाव म्हणजे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर! प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात चांगले वाईट प्रसंग हे येतच असतात. असे प्रसंग खुद्द लता दिदींच्या आयुष्यात देखील अनेकदा आले आहेत. त्यापैकीच एक भयावह प्रसंग म्हणजे त्यांच्यावर झालेला ‘विषप्रयोग…’ हो हे खरं आहे आणि काही दिवसांपूर्वी खुद्द लता दिदींनीच या प्रसंगाबद्दल सांगितलं होतं.
लता दिदी त्यावेळी ३३ वर्षांच्या होत्या. साल होतं १९६३! अचानक एके दिवशी लता दिदींना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांची तब्येत खूप खालावली इतकी की त्यांना स्वतःच्या पायावर उभं देखील राहता येत नव्हतं. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तेव्हा कळालं की लता मंगेशकर यांच्यावर थोड्या प्रमाणात विषप्रयोग झाला होता. त्यांच्यावर उपचार करत होते डॉ.कपूर! पुढील ३ महिने त्या अंथरुणाला खिळून होत्या.
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की त्यांना गायनाला डॉक्टरांनी कधीच मनाई केली नव्हती. त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाला अनुसरून त्यांच्या आवाजाबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. डॉ. आर.पी. कपूर यांच्या प्रयत्नांमुळे आणि स्वतःच्या इच्छाशक्तीमुळे त्या लवकर बऱ्या झाल्या.
या भयावह घटनेनंतर लता दिदींची तब्येत सावरत होती. आणि एक दिवस हेमंत कुमार आले आणि दिदींच्या आईची परवानगी घेऊन दिदींना रेकॉर्डिंग साठी घेऊन गेले. या आजारपणानंतर दीदींनी जर कोणतं पहिलं गाणं गायलं असेल तर ते होतं “कही दीप जले कही दिल।” हे गाणं त्या वर्षी खूप गाजलं. सोबतच त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील या गाण्यासाठी लता दिदींनाच मिळाला होता.
त्या कठीण काळात लता मंगेशकरांना आजारातून बरं व्हायला जर कुणाची मदत झाली असेल तर ती प्रख्यात गीतकार मजरुह सुल्तानपुरी यांची! असं त्या स्वतः सांगतात. मजरुह सुल्तानपुरी दररोज दिदींच्या घरी जायचे व त्यांच्या शेजारी बसून नवनव्या कविता ऐकवायचे. त्यांच्यासोबतच घरातलं साधं जेवण जेवायचे.
लता दिदींवर कुणी विषप्रयोग केला होता हे त्यांना व मंगेशकर कुटुंबियांना कळालं होतं परंतु कधीच त्यांनी त्या व्यक्तीचं नाव नाही सांगितलं किंवा पोलिसात तक्रार नाही दिली कारण त्यांच्याजवळ त्या घटनेचे पुरावे नव्हते. घडल्या प्रकाराबाबत एकूणच मंगेशकर कुटुंबीयांनी कधीही वक्तव्य केलं नाही कारण तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयावह प्रसंग होता असं लता मंगेशकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर कुणी व का विषप्रयोग केला असेल हे सद्यस्थितीनुसार भविष्यात सुद्धा गूढच राहील यात काही शंका नाही. सध्या लता मंगेशकर ९१ वर्षांच्या असून त्या ट्विटर वर सक्रिय आहेत. त्यांनी गाणं जरी थांबवलं असलं तरी त्यांची हजारो गाणी पुढील अनंत काळासाठी आपल्याला आनंद देत राहतील यात काही शंका नाही.