Tuesday, April 16, 2024

…आणि तब्बल २० सुप्पर डुप्पर हिट देणारी सलीम-जावेदची जोडी ‘या’ कारणामुळे झाली वेगळी

हिंदी चित्रपटांचे लोकप्रिय लेखक, पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर हे आजमितीला ७६ वर्षांचे झाले आहेत. शब्दांचा उत्कृष्ट वापर आणि त्यांचे वर्णन करण्याची जबरदस्त क्षमता जावेद यांना इतरांपेक्षा भिन्न बनवते. अख्तर यांनी आपल्या कारकीर्दीत सीता गीता, जंजीर, शोले आणि तेजाब सारख्या अनेक चित्रपटांसाठी संवाद आणि कथा लिहिल्या आहेत. ब्लॉकबस्टर चित्रपटांशिवाय जावेद आपल्या उत्कृष्ट कविता आणि लेखनातून लोकांना आश्चर्यचकित करत आले आहेत.

इतकंच काय तर अख्तर साहेब हे सद्यस्थितीत घडणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर निर्भिडपणे बोलतात. याबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात देखील आलं आहे. तर आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत जावेद अख्तर यांचा जीवनप्रवास आणि त्यांच्या काही गाजलेल्या शायऱ्या! पहिली शायरी सुरुवातीलाच घेऊयात. “कभी जो ख्वाब था वो पा लिया है, मगर जो खो गई वो चीज क्या थी।”

जावेद अख्तर यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला होता. जावेद यांचे वडील जान निसार अख्तर एक कवी होते आणि आई एक उर्दू लेखक तसेच शिक्षिका होत्या. लहान वयातच आईला गमावल्यानंतर जावेद यांनी आपल्या आजोबांसोबत राहून लखनौहून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी भोपाळच्या सेफिया महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. जावेद अख्तर यांचं खरं नाव जादू ठेवलं गेलं होतं. त्यांच्या वडिलांनी हे नाव स्वलिखित शेर, लम्हा-लम्हा किसी जादू का फसाना होगा, मधून घेतलं होतं. परंतु नंतर त्यांचं नाव बदलून जावेद केलं गेलं. कारण की ही दोन्ही नावं एकमेकांशी जुळतात. “क्यूँ डरें जिंदगी में क्या होगा, कुछ ना होगा तो तजुर्बा होगा।”

भारतीय चित्रपटसृष्टीतली सर्वात लोकप्रिय पटकथा लेखक जोडी जावेद अख्तर आणि सलीम यांनी आपल्या करिअरची सुरूवात राजेश खन्ना यांच्या चित्रपटाद्वारे केली. जो १९७१ साली प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट अंदाज होता. त्यानंतर या जोडीने अधिकार, हाथी मेरे साथी, सीता-गीता, यादों की बरात आणि जंजीर अशा २४ चित्रपटांसाठी पटकथा लिहिली. त्यापैकी २० बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. १९८२ मध्ये अहंकार आड आल्यामुळे सलीम-जावेदची ही प्रसिद्ध जोडी फुटली आणि दोघांनीही वेगवेगळ्या चित्रपटांसाठी एकट्याने लेखन सुरू केलं. “बंध गई थी दिल में कुछ उम्मीदें भी, खैर जो तुमने किया वो सही किया।”

जावेद अख्तर यांनी १९७२ मध्ये हनी इराणीशी लग्न केलं होतं. या दोघांनाही फरहान अख्तर आणि जोया अख्तर ही दोन मुले आहेत. विवाहित असूनही जावेद यांनी त्यांच्यापेक्षा दहा वर्षे लहान असलेल्या शबाना आझमीशी दुसरं लग्न केलं. लग्नाच्या एका वर्षानंतर जावेद आणि पहिली पत्नी हनी इराणी यांनी घटस्फोट घेतला.

शबाना आझमी या प्रसिद्ध उर्दू लेखक कैफी आजमींची मुलगी. जावेद कैफि यांना लिखाणाच्या संदर्भात वारंवार भेट देत असत , तिथे त्यांची भेट शबानाशी झाली होती. काही दिवसांतच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. शबानाची आई तिच्या आणि जावेद यांच्या लग्नाच्या विरोधात होती. शबानाने आधीपासूनच विवाहित व्यक्तीशी लग्न करावे अशी तिची इच्छा नव्हती. परंतु शबानाने घरातील सदस्यांना बर्‍याच विनंत्या केल्या आणि लग्नासाठी होकार मिळवला. जावेद आणि शबाना यांना एकही अपत्य नाही. “यही हालात इब्तिदा सा रहे, लोग हमसे खफा, खफा से रहे।”

जावेद अख्तर यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २००७ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय त्यांना ५ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि ८ वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सन २०२० मध्ये जावेद यांना धर्मनिरपेक्षता आणि मुक्त विचारसरणीचा पुरस्कार म्हणून रिचर्ड डॉकिंस पुरस्कार देण्यात आला आहे. “इस शहर में जीने के अंदाज निराले है, होठों पे लतिफें हैं, आवाज में चाले हैं।”

हे देखील वाचा