संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा हाहाकार वाढताना दिसत आहे. अनेक निर्बंध लावून देखील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रासोबतच अनेक राज्य कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. तसेच मृत्यूदर आता वाढला आहे. अनेकांचे जीव जाताना दिसत आहे. यातच दिग्गज गीतकार पंडित किरण मिश्र यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ते मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी कोरोनामुळे शेवटचा श्वास घेतला. मिश्र यांनी पंधरा दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. परंतु त्यानंतर त्यांना खूप ताप आला, आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांची शारीरिक स्थिती खूपच खालवली. आणि कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला.
किरण मिश्र यांचा मुलगा स्वदेश मिश्र याने सांगितले की, “काही दिवसांपूर्वी आम्ही त्यांची कोरोना चाचणी केली होती. परंतु तेव्हा ती चाचणी निगेटिव्ह नंतर त्यांचे हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचे सिटीस्कॅन केले, तेव्हा त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली.” त्यांना 13 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वदेशने पुढे सांगितले की, “अचानक त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी झाली. तसेच त्यांना श्वास घ्यायला देखील त्रास होत होता. आणि ब्लड प्रेशर देखील वाढला होता. तीन दिवसांच्या उपचारानंतर आम्हाला समजले की, त्यांच्या फुप्फुसांवर खूप परिणाम झाला आहे आणि आता त्यांचे शरीर काम करत नाही.”
किरण मिश्र यांनी अनेक भक्तीपर गीते गायली आहे. तसेच अनेक चित्रपटात देखील गाणी गायली आहेत, अनेक मालिकांचे पार्श्वसंगीत देखील त्यांनी दिले आहे. गायक अनुप जलोटा यांनी किरण मिश्र यांनी लिहिलेली जवळपास 50 पेक्षाही जास्त गाणी गायली आहेत. किरण मिश्र यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच ते खूपच भावुक झाले. त्यांनी सांगितले की, “अत्यंत साध्या आणि सरळ स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणजे किरण मिश्र. ते खूप आपलेपणाच्या भावनेने सगळ्यांशी बोलायचे. या वयात त्यांचा मृत्यू खूपच हैराण करणारा आहे. त्यांची मैत्री नेहमीच माझ्या मनात जीवंत राहील.”