Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड ‘…नोटीस जारी करा’, बिग बींच्या बंगल्याची भिंत पाडण्याच्या दिरंगाईवरून लोकायुक्तांचा बीएमसीला टोला

‘…नोटीस जारी करा’, बिग बींच्या बंगल्याची भिंत पाडण्याच्या दिरंगाईवरून लोकायुक्तांचा बीएमसीला टोला

बॉलिवूड कलाकार कधी कोणत्या कारणामुळे चर्चेत येतील, याचा काही नेम नाही. पण जेव्हा त्यांच्याबद्दल कोणतीही चर्चा सुरू होते, त्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले जाते. असेच काहीसे झाले आहे, ते म्हणजे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबाबत. रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी अमिताभ यांच्या जुहू येथील ‘प्रतीक्षा’ या बंगल्याची भिंत पाडण्याचे काम लांबणीवर पडत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या लोकायुक्तांनी मंगळवारी (०४ जानेवारी) बृहन्मुंबई महानगरपालिकेला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

महाराष्ट्र लोकायुक्तचे जस्टीस व्ही. एम. कनाडे यांनी म्हटले आहे की, याप्रकरणी दिरंगाईबाबत बीएमसीचे अधिकारी बेताल वक्तव्य करत आहेत. खरं तर ‘प्रतीक्षा’ या बंगल्याची भिंत रस्त्याच्या रुंदीकरणात अडचण ठरत होती. त्यामुळे ती पाडण्याचा आदेश बीएमसीकडून देण्यात आला होता.

न्यायमूर्तींचा आदेश
महाराष्ट्र लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी आपल्या नुकत्याच दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, पाडकामाला किमान एक वर्षाचा विलंब झाला असून, नागरी संस्थेने उपअभियंता (रस्ते) पश्चिम उपनगर यांच्या नावाने नोटीस जारी करावी.

बीएमसीची बाजू
यावर बीएमसीने अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्या बंगल्याची भिंत अद्याप पाडलेली नाही, कारण रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी त्यांच्याकडे कोणताही कंत्राटदार नाही, असे म्हटले होते. शिवसेना-नियंत्रित नागरी संस्थेने पुढील आर्थिक वर्षात रस्ता कंत्राटदाराची नियुक्ती केल्यावर ती भिंत पाडून जमीन संपादित करणार असल्याचेही सांगितले.

लोकायुक्तांनी सुनावले खडेबोल
जेव्हा जेव्हा रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प हाती घेतला जातो, तेव्हा बीएमसीकडून अंमलबजावणीसाठी पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद केली जाते. हे लक्षात घेऊन लोकायुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, अनावश्यक कारणे देऊन बीएमसीला बच्चन कुटुंबाच्या बंगल्याची भिंत पाडायची नाही हे उघड आहे.

काय होती योजना?
सन २०१७ मध्ये अमिताभ यांना जुहू येथील लिंकिंग रोडवरील बंगल्यातील जमिनीचा काही भाग त्यांना आणि त्यांच्या शेजार्‍यांना इस्कॉन मंदिराकडे जाणार्‍या वेटिंग लेनमधील रहदारी कमी करण्यासाठी सुपूर्द करण्यास सांगण्यात आले होते. बंगल्याच्या कंपाऊंड भागावरील संत ज्ञानेश्वर रोडचे ४० फुटांवरून ६० फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याची योजना बीएमसीने आखली होती.

अमिताभ यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ते शेवटचे २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘चेहरे’ या सिनेमात दिसले होते. आता ते आगामी ‘ब्रह्मास्त्र’, ‘मेडे’, ‘द इंटर्न’ यांसारख्या अनेक सिनेमात झळकणार आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा