भारताचे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्याबद्दल आपण बरेच वाचले आणि पाहिले सुद्धा आहे. बॉलिवूडमध्येही बरेच सिनेमे बनली आहेत, ज्यात महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित बऱ्याच गोष्टी पडद्यावर मांडल्या गेलेल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट हिट ठरले, तर काही चित्रपटांना बऱ्याच वादांना सामोरे जावे लागले होते. आज या लेखात आम्ही महात्मा गांधी जीवनावरील चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.
१. महात्मा: लाईफ ऑफ गांधी (१८६९-१९४८)
‘महात्मा: लाईफ ऑफ गांधी’ या चित्रपटात गांधीजींचे जीवन आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे वर्णन केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘विटाभाई झवेरी’ यांनी केले होते. त्याचप्रमाणे चित्रपटाची भाषा ही इंग्रजी होती. गांधी सरकारच्या फिल्म डिव्हिजनच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी नॅशनल मेमोरिअल फंड’ने या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होता तो लोकांना खूपच आवडला.
२. गांधी
महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘गांधी’ हा चित्रपट ३० नोव्हेंबर १९८२ रोजी रिलीझ झाला होता. रिचर्ड एटनबरो यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. रविशंकर यांनी चित्रपटाला संगीत दिले होते. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यावर तयार करण्यात आलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. गांधी चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अकादमी पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे हा चित्रपट पाकिस्तानात रिलीज होऊ दिला नाही.
३. द मेकिंग ऑफ द महात्मा
शाम बेनेगल यांनी महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित ‘द मेकिंग ऑफ महात्मा’ चित्रपट तयार केला. यात महात्मा गांधीजी यांचा महात्मा बनण्याचा प्रवास दाखवला. त्याचप्रमाणे या चित्रपटामध्ये गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांवरील जातीय भेदभावांविरुद्ध आवाज उठवल्याचे देखील दाखवण्यात आले होते. १९९६ मध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला होता. यात रजत कपूर महात्मा गांधीजींच्या भूमिकेत होते. त्यांना सर्वोत्तम अभिनेता म्हणून नॅशनल अवॉर्ड देखील या चित्रपटासाठी मिळाला होता.
४. हे राम
सन २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हे राम’ या चित्रपटात गांधीजींची भूमिका नसिरुद्दीन शाह यांनी साकारली होती. त्याचप्रमाणे ‘हे राम’ हा चित्रपट भारताची फाळणी आणि महात्मा गांधीजींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला चित्रपट होता.
५. मैनें गांधी को नहीं मारा
सन २००५ मध्ये महात्मा गांधीजी यांच्या जीवनावर आधारित ‘मैने गांधी को नहीं मारा’ चित्रपट आला होता. अभिनेता अनुपम खेरने या चित्रपटामध्ये शानदार कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे उर्मिला मातोंडकर यांच्या देखील कामाचे कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, विशेष ज्युरी पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.
६. लगे रहो मुन्नाभाई
सन २००६ साली मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात महात्मा गांधीजींची भूमिका साकारली होती. गांधीगिरीची एक आगळीवेगळी कॉन्सेप्ट या चित्रपटात दाखवण्यात आली असून आजच्या काळात गांधीजींवर आधारित असलेला हा चित्रपट अत्यंत प्रसिद्ध आहे. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट खूप आवडला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
असे जगप्रसिद्ध सेलिब्रिटीज ज्यांना घेतलं होतं दत्तक, पुढे स्वकर्तृत्त्वावर मिळवलं सगळं काही