Wednesday, July 3, 2024

कॅन्सरवर उपचार सुरू असताना महेश मांजरेकरांनी केले होते ‘अंतिम’चे शूटिंग

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन सुरू होण्याच्या काही दिवस आधीच महेश मांजरेकर कॅन्सरग्रस्त झाले होते. ही बाब समोर आली आणि सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर मात्र या गोष्टीची जास्त वाच्यता झाली नाही. नुकताच सलमान खान आणि आयुष्य शर्मा यांच्या ‘अंतिम’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट झाला. त्यावेळी महेश मांजरेकरांनी ते या सिनेमाच्या शूटिंगवेळी कॅन्सरग्रस्त झाल्याचे सांगितले.

अंतिम चित्रपटाच्या ट्रेलर लाँच प्रसंगी महेश मांजरेकर त्यांच्या आजाराबद्दल म्हणाले, “अंतिम चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात मला कॅन्सरचे निदान झाले होते. मी कॅन्सर झाला असतानाही सिनेमाच्या शेवटच्या भागाचे शूटिंग करत होतो. त्याकाळात माझ्या किमोथेरपी सुरू होत्या. ‘माझे ३५ किलो वजन कमी झाले. आज तुम्हाला सर्वांना सांगताना मला खूप आनंद होत आहे की मी कॅन्सरमुक्त झालो आहे.”

पुढे महेश मांजरेकर म्हणाले, “जेव्हा मला कॅन्सर झाल्याचे समजले तेव्हा मला धक्का बसला नाही. मी ते स्वीकारले. असे अनेक लोकं आहेत ज्यांना कॅन्सर होतो, पण ते हिंमतीने लढतात. सुदैवाने मला फारसा त्रास झाला नाही. माझी टीम सतत माझी काळजी घेत होती आणि मला मदत करत होती. मी खूप आरामात होतो. सलमान आणि आयुष या दोघांनी मला खूप मदत केली.”

सलमानबद्दल बोलताना महेश म्हणाले, “मी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये मला अभिनय करायला आवडत नाही, तुम्ही स्वत:ला पाहू शकत नाही, तुमच्या शॉटला तुम्ही न्याय देऊ शकत नाही. याशिवाय तुम्ही काय केले आहे हे तुम्हालाच कळत नाही. या चित्रपटात एक पाहुण्या कलाकाराची भूमिका होती, म्हणून मी ती केली. मी सलमानला खूप वर्षांपासून ओळखतो. तो मला भावासारखा असून, आम्ही सोबत अनेक सिनेमे केले आहेत. त्याला दिग्दर्शित करणे अजिबात कठीण नाही. कारण त्याला माहित असते की मला त्याच्याकडून काय हवे आहे.”

‘प्लान’, ‘जिंदा’, ‘मुसाफिर’, कांटे, ‘दस कहानियां’, ‘वाँटेड’, ‘रेडी’, ‘दबंग’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत. नुकतेच ते डिस्ने प्लस हॉटस्टारच्या १९६२: द वॉर इन द हिलमध्ये दिसले होते. महेश मांजरेकर हे केवळ अभिनेतेच नाहीत तर उत्तम दिग्दर्शकही आहेत. त्यांनी ‘आई’, ‘वास्तव’, ‘निदान’,’काकस्पर्श’, ‘विरुद्ध’ आदी अनेक सरस चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

महेश यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती, जी यशस्वी ठरली. मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर ते काही दिवस रुग्णालयात दाखल होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी चित्रपटांना तोड नाही! लक्ष्याचे ‘हे’ पाच अफलातून चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

-‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील ‘शंतनू’ लक्ष्याआधीच जग सोडून गेला, चित्रपती व्ही शांताराम होते त्याचे आजोबा

-‘मैने प्यार किया’ची ३१ वर्षे! लक्ष्याचं बॉलिवूड पदार्पण ते सलमानचं मानधन, वाचा चित्रपटाबद्दल काही रंजक गोष्टी

हे देखील वाचा