‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका या दिवसांत प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अशातच या मालिकेत छोटीशी भूमिका साकारलेली अभिनेत्री धनश्री भालेकर (Dhanashri Bhalekar) एका भलत्याच कारणाने चर्चेत आली आहे.
धनश्री भालेकरने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत एक छोटीशीच भूमिका साकारली. पण याद्वारे तिने चाहत्यांच्या मनात तिच्याबद्दल खास स्थानही निर्माण केलं. अलीकडेच अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. खरं तर धनश्रीची फसवणूक करण्यात आली होती, त्याबद्दल तिने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तसेच या व्हिडिओमध्ये तिने झालेला सगळा प्रकार आणि तिला पैसे परत कसे मिळाले, याबद्दल सविस्तर सांगितले आहे. (majhi tujhi reshimgath actress dhanashree bhalekar got my fraudulent money back share video)
धनश्री या व्हिडिओमध्ये म्हणते की, “मी या आधी काही व्हिडीओद्वारे माझ्यासोबत झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणाबद्दल सांगितले होते. पण आज मला तुम्हाला सर्वांना सांगताना खूप आनंद होतोय की, त्या फसवणुकीच्या प्रकरणात माझे गेलेले सर्व पैसे मला परत मिळाले आहेत. यासाठी मी पोलिसांचे विशेष आभार मानते. ज्यांनी खूप छान तपास करुन मला माझे पैसे परत मिळवून देण्यात मदत केली. त्यासोबत चाहत्यांनी मला या काळात खूप आधार दिला. त्यासाठी धन्यवाद.”
पुढे अभिनेत्री म्हणते की, “यानिमित्ताने मला तुम्हाला सांगायचे आहे की जर तुमची कोणी फसवणूक केली असेल तर त्याविरोधात आवाज उठवा. जेव्हा आपण त्याबद्दल आवाज उठवतो तेव्हा समाजात असणारी इतर लोक आपल्याला मदत करतात. पण आपण पहिलं पाऊल उचललं नाही तर हे शक्य होत नाही. त्यामुळे कृपया तुमच्याबरोबर अशी कोणतीही फसवणूक झाली असेल किंवा होत असेल तर तक्रार दाखल केला. त्यासोबत सर्वात आधी हे होऊ नये याची काळजी घ्या. पोलीस प्रशासन सर्वजण आपली मदत करतात.”
याबाबद्दल पुढे बोलताना अभिनेत्री म्हणते की, “जर आपण तक्रार दाखल केली नाही तर फसवणूक करणाऱ्यांचे तितकेच फावते. त्यामुळे यांना अद्दल घडवणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. आपल्या सर्वांना हेच वाटत की फसवणूक झाली की पैसे परत मिळत नाहीत. पण असे नसते. एखादी फसवणूक झाली तरी पैसे परत मिळतात. फक्त तुम्हाला पहिलं पाऊल उचलणे गरजेचे असते.”
या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.










