Wednesday, July 3, 2024

कंगना रणौतला मनोज तिवारी यांनी दिला सल्ला; म्हणाले, ‘तुमची भाषा…’

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या चित्रपटांपेक्षा विवादांमुळे जास्त चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते, ज्यावरून ती अनेक विषयांवर आपले मत मांडत असते. यामुळे अनेकदा तिला टीकेचा सामनाही करावा लागतो. कंगनाच्या याच वृत्तीमुळे तिच्यावर अभिनेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी जोरदार टीका केली आहे.

अभिनेत्री कंगना रणौत आणि हे प्रकरण काही नवीन नाही. सुशांत सिंग राजपूतपासून (Sushant Singh Rajput) अनेक मुद्द्यांवर बोलण्याने ती चर्चेत आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तिने केलेल्या वक्तव्याने जोरदार वाद रंगला होता. ती नेहमीच भाजप आणि नरेंद्र मोदींचे समर्थन करताना दिसत असते. मात्र याच भाजपमधील दिल्लीचे नेते मनोज तिवारी यांनी कंगनावर जोरदार टीका करत आपली भाषा सुधारण्याचा सल्ला दिला आहे.

नुकतेच मनोज तिवारी यांनी एका मुलाखतीत बोलताना देशातील राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले होते. यावेळी कंगना बद्दल बोलताना त्यांनी तिची वागणूक ठीक नसल्याचे विधान केले आहे. कंगनाच्या मुद्द्यावर बोलताना मनोज तिवारी म्हणाले की, “आपले विचार इतके उग्र असू नयेत की एखाद्याच्या भावना दुखावल्या जातील. कलाकाराचा आपला एक धर्म असतो जो त्यांनी जपला पाहिजे. आपण जर राजकारणात असलो तर ते चालू शकते. मात्र कलाकार म्हणून आपण आपले मत व्यक्त करताना काळजी घेतली पाहिजे. सुशांत सिंग बद्दलचे तिचे मत समजू शकतो. मात्र महाराष्ट्र सरकारबद्दल तिचे बोलणे खूपच चुकीचे आहे. कुणाचाही अपमान करणे आपल्या देशाच्या संस्कृतीत बसत नाही. मुख्यमंत्री, पंतप्रधान या पदावरील व्यक्तींचा आपण आदर केला पाहिजे. विरोध नक्की करावा पण तो सभ्य भाषेत असावा.”

आता मनोज तिवारी यांच्या या सल्ल्यावर कंगना काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा