मंडळी, साधारणतः आपल्याकडे आधी लग्नाची बातमी दिली जाते, धुमधडाक्यात लग्न होतं आणि मग कालांतराने घरात पाळणा हलणार असल्याचंही सांगितलं जातं. आता जरा हाच क्रम सेलिब्रिटी व्यक्तींच्या बाबतीत लावा. अगदी सारखाच बरं का! आपल्या लक्षात येईल की क्रम जरी सारखाच असला तरी त्याचा आवाका हा खूप मोठा असतो. सामान्य व्यक्तीची आमंत्रणं, गोड बातमी ही काही व्यक्तींपूर्तीच मर्यादित असते. परंतु सेलिब्रिटींचं तसं नसतं. सेलिब्रिटींची आमंत्रणं असोत किंवा त्यांच्याकडे असणारी गोड बातमी असो याची चर्चा ही जगभर असते. काहींची तर देशभर तरी असतेच असते. पण भोजपुरी सिनेमाचे सुपरस्टार तसेच भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्या बाबतीत हा क्रम जरा उलटाच झाला. आधी त्यांनी त्यांना कन्यारत्न झाल्याची बातमी दिली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल खुलासा केला. चला तर मग नेमकं हे प्रकरण काय आहे हे जरा आपण समजून घेऊयात.
भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार आणि भाजप खासदार मोनज तिवारी यांच्या एक गोंडस कन्येचा जन्म झाला आहे. लेकीच्या जन्मानंतरच मनोज तिवारी यांचं दुसरं लग्न झाल्याची बाब देखील उघडकीस आली. जी गोष्ट त्यांनी आतापर्यंत सर्वांपासून लपवून ठेवली होती. मनोज तिवारी यांनी लेकीच्या जन्मानंतर स्वतः दुसऱ्या लग्नावर मोकळेपणाने बोलण्यास सुरुवात केली. हे दुसरं लग्न त्यांनी आपली मोठी लेक जिया हिच्या सांगण्यावरून केलं असल्याचा खुलासा त्यांनी केला.
मनोज तिवारी यांनी २०१२ मध्ये त्यांची पहिली पत्नी राणी यांच्याशी घटस्फोट घेतला होता. मनोज आणि राणी यांना जिया ही लेक आहे. राणी आणि मनोज यांच्यात मतभेद व्हायला लागल्यानंतर राणी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता आणि मनोज यांनीही तो मान्य केला होता. माध्यमांशी बोलताना मनोज तिवारी यांनी आपली दुसरी पत्नी सुरभी यांच्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. मनोज यांनी सांगितलं की, ‘सुरभी आणि माझं लग्न एप्रिलमध्ये लॉकडाऊन दरम्यान झालं होतं. ती माझी प्रशासकीय कामे सांभाळत असे. वास्तविक, ती एक गायिका आहे आणि तिने माझ्याबरोबर एका म्युझिक व्हिडिओमध्ये गायलं देखील आहे. माझी मोठी मुलगी जियाने सुरभीबरोबरच्या माझ्या नात्यावर सकारात्मकरित्या पाहिलं आणि आम्ही दोघांनी लग्न करायला हवं असा सल्ला दिला. जिया आणि सुरभीमध्ये अगदी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.’
माध्यमांशी बोलताना मनोज यांनी आपल्या पहिल्या पत्नीबद्दल बोलताना सांगितलं की, ‘राणीसोबतचे माझे संबंध संपून जवळजवळ १० वर्षे झाली आहेत, परंतु तरीही आमच्यातील नातं अजूनही चांगलं आहे. जेव्हा मी तिच्या आग्रहामुळे २०१२ मध्ये तिच्यापासून विभक्त झालो. त्यावेळी आयुष्य काहीसे विचित्र झालं होतं. मी नेहमीच जियाच्या संपर्कात राहत आलो आहे. सध्या ती मुंबईत राणीसमवेत राहते.’
विशेष म्हणजे, नुकतीच मनोज तिवारी यांनी ३१ डिसेंबर रोजी चाहत्यांसह मुलीच्या जन्माची गोड बातमी शेअर केली. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर आपल्या मुलीचे फोटो शेअर केले. फोटोसोबत असलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘माझ्या घरी एका लहान परीचं आगमन’ असं लिहिलं आहे. तोपर्यंत कुणालाही मनोज तिवारी यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काहीही ठाऊक नव्हतं. यानंतर मनोज यांनी स्वतःच या सगळ्याचा खुलासा केला होता. हे सगळं घडत असताना आपण मनोज यांच्या वयाचा देखील विचार करायला हवा कारण मनोज यांचं वय सध्या ५० आहे.