Wednesday, July 3, 2024

‘राधे’ चित्रपटात छोटी भूमिका साकारल्याने चाहते नाराज; कारण देत प्रविण तरडे म्हणाला, ‘मला सलमान भाईसोबत…’

नुकताच ईदच्या खास प्रसंगी सलमान खानचा ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ रिलीझ झाला होता, ज्याच्याबद्दल आतापर्यंत चर्चा होत आहेत. भाईजानच्या चाहत्यांना हा चित्रपट आवडला आहे, तर याला सलमानच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट चित्रपट म्हणणार्‍या लोकांचीही कमी नाहीये. ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता प्रवीण तरडे याने देखील या चित्रपटात काम केले आहे. नुकताच त्याने चित्रपटात काम केल्याबद्दल त्याचा अनुभव सांगितला आहे.

खरं तर, भाईजानच्या या चित्रपटात प्रवीण तरडेने एका गुंडाची भूमिका साकारली, ज्याचे नाव ‘दगडू दादा’ असते. ही खूप लहान व्यक्तिरेखा आहे. सलमानच्या चित्रपटात इतकी लहान भूमिका साकारल्यामुळे, प्रवीण तरडेचे चाहते नाराज झाले आहेत, असे अभिनेत्याने सांगितले. सोशल मीडियावर चाहते त्याला विचारत आहेत की, भाऊ तू इतकी लहानशी भूमिका का केलीस?

याबद्दल बोलताना प्रवीण म्हणाला की, “मी लहान सहान भूमिका साकारतच इथवर आलो आहे. भूमिकेच्या लांबी-रुंदीने मला फरक पडत नाही. मी कोणती व्यक्तिरेखा करत आहे, हे महत्त्वाचे आहे. मला सलमान भाईसोबत चांगले नाते निर्माण करायचे होते. तसेच, त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट होता. मला तो माणूस म्हणून आवडतो.” याचकारणामुळे त्याने राधे चित्रपटात काम केल्याचे कारण सांगितले.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, सलमानचे वडील सलीम खान यांनीदेखील चित्रपटाबद्दल निराशा व्यक्ती केली होती. त्यांच्या मते ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ पेक्षा ‘बजरंगी भाईजान’ व ‘दबंग ३’ कित्येक पटीने चांगले होते. त्यांच्या अशा बोलण्याने सलमानचे चाहतेही चकित झाले होते.

ईदच्या दिवशी रिलीझ झालेल्या सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ला खूप खराब रेटिंग मिळाली आहे. याशिवाय सोशल मीडियावरही या चित्रपटाविषयी बरीच चर्चा रंगली असून, त्याची खिल्ली उडवली जात आहे. पण सलमानने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, राधे हा पूर्णपणे मनोरंजन करणारा चित्रपट आहे, जो कोणत्याही प्रकारचा सामाजिक संदेश देत नाही. केवळ मनोरंजन करण्याच्या उद्देशाने हा चित्रपट बनवला गेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा