Wednesday, January 14, 2026
Home मराठी ज्याचा मराठमोळा सिद्धू लहानपणापासून होता दिवाना; त्याच व्यक्तीबरोबर मिळाली काम करण्याची संधी

ज्याचा मराठमोळा सिद्धू लहानपणापासून होता दिवाना; त्याच व्यक्तीबरोबर मिळाली काम करण्याची संधी

आपल्या चहित्या कलाकाराला भेटणे, हे सर्वांचेच स्वप्न असते. बऱ्याच वेळा आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी चाहते अनेक प्रयत्न करतात. इतके काही करूनही जेव्हा आवडत्या ताऱ्याची भेट होत नाही, तेव्हा मात्र चाहते निराश होतात. पण याउलट जेव्हा त्यांना आपल्या चहित्या कलाकाराला भेटण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांचा आनंद गगनातही मावत नाही. असंच काहीसं घडलंय, आपल्या लाडक्या सिद्धू म्हणजेच, मराठमोळा अभिनेता सिध्दार्थ जाधव सोबत!

अभिनेता सिध्दार्थ जाधवला कोणत्याही परिचयाची गरज नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने मराठी, तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले नाव कमावले आहे. सिध्दार्थ फोटो व व्हिडिओ शेअर करून, बऱ्याच वेळा त्याच्या भावना चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. नुकताच त्याने त्याच्या आवडत्या कलाकारासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा फोटो आहे, प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक प्रभुदेवाचा. तसे तर प्रभुदेवाचे लाखो चाहते आहेत. त्यातलाच एक चाहता आहे सिद्धू! सिध्दार्थने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करत लिहिले, “प्रभूदेवा… त्याचं ‘हम से है मुकाबला’ मधलं चित्र असलेलं दप्तर घेऊन जायचो. दप्तरावरचं चित्र जिवंत होऊन समोर येईल असं कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. पण यावेळेस दप्तरावरचं स्वप्न घेऊन जगणाऱ्या मला, दप्तराच्या बाहेरचं खूप काही शिकायला मिळालं. कलाकार म्हणून नेहमीच वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची संधी मिळत असते आणि मी ती संधी सहसा सोडत नाही.” असे म्हणत सिद्धार्थने आपला आनंद शब्दात व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

खरं तर प्रभूदेवाच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या, ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’मध्ये सिद्धार्थची महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि दिशा पाटणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिद्धार्थने ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘दे धक्का’, ‘हुप्पा हुइया’, ‘टाइम प्लीज’, ‘धुरळा’ इत्यादी चित्रपटात अभिनय करून, प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्येही ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हे देखील वाचा