Monday, July 1, 2024

‘अर्थात तुम्ही झिंगाट पिढी’, म्हणत वादग्रस्त अभिनेत्री असलेला केतकी चितळेने पोस्ट केली स्वरचित कविता

अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या विवादित वक्तव्यांमुळे आणि वादांमुळेच जास्त गाजते. मात्र तरीही केतकी कधीच तिच्या वागण्यापासून मागे हटत नाही. केतकीला शरद पवार यांच्याविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे जेलमध्ये देखील जावे लागले होते. आता पुन्हा एकदा केतकी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. केतकीने आता एक कविता पोस्ट केली आहे. त्यात तिने आजच्या पिढीला झिंगाट पिढी म्हटले आहे. तिने तिच्या कवितेसोबतच तिचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

केतकीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, “नमस्कार, मी केतकी चितळे, आज मी एक कविता पोस्ट केली आहे. आज मराठी दिन, महाराष्ट्र दिन किंवा मराठी भाषेविषयी कोणतंही खास निमित्त नाही. कोणताही कार्यक्रम, सणदेखील नाही. आज काहीही साजरं करण्यासाठी मी हे रचलेले नाही. यामागचे कारण म्हणजे एका व्यक्तीने मला इन्स्टाग्रामवर मेसेज करत दमलेल्या बापाची कहाणी अशा नावाखाली एक मोठा मेसेज केला. मला का केला असा मेसेज याचा मी विचार केला. त्यांनी मला या गाण्याचे काही शब्द मेसेज केले. त्यावर त्यांनी मला हे नवीन असल्याचे सांगितलं. पण आजकालच्या पिढीला हे गाणं हल्लीच आलेलं आहे हे देखील माहिती नाही. हे वाचून मला फार विचित्र वाटलं. यावरुन मला ही कविता सुचली. मला जसे जसे शब्द सुचत गेले तसं तसं मी ते रचले”. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांची ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे गाणे यूटुबवर देखील असल्याचे तिने सांगितले.

केतकीने लिहिलेली कविता आहे,
“अर्थात तुम्ही झिंगाट पिढी,
अशुद्ध मराठी प्यारी.
भाषेविषयी अक्कल नाही,
पण फुकट, न कमवलेला अभिमान जोपासणारी.
अर्थात तुम्ही झिंगाट पिढी.

शुद्धलेखनाची बोंब तुमची,
मातृ-पितृ वाणी ही चुकीची.
पण मायबोलीचे ठेकेदार तुम्हीच,
जरी आनी-पानी-गोनी असली तुमची.
अर्थात तुम्ही झिंगाट पिढी.

कुणी वेगळी वाणी वापरलीच, तर
बलात्कार व मारून टाकायच्या धमक्या देणार.
रुबाब जणू, आविष्कार तुम्हीच केलात मराठीचा,
पण ना तुमचे प्रेम, ना आदर, ना ही सहयोग असे भाषाज्ञानी.
अर्थात तुम्ही झिंगाट पिढी.”

यानंतर केतकीच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. केतकीने झी मराठीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेत काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काली काली जुल्फों के …! रिधीमा पंडीतची घायाळ करणारी अदा, पाहाच फोटो गॅलरी
अनुपम खेर यांनी ट्विट करत ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची केली मागणी, अक्षय कुमारने देखील दिला दुजोरा

हे देखील वाचा