सोशल मीडियावर ट्रोल होणे काही नवीन नाही. विशेष म्हणजे ट्रोल होणे आणि ट्रोल करणे हे सोशल मीडियावर सामान्य मानले जाते. छोट्या कलाकारांपासून ते अमिताभ बच्चन सारखे मोठ- मोठे कलाकार देखील या ट्रोलिंगला बळी पडतात. अशावेळी काही कलाकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, तर काहीजण ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देतात. असाच काहीसा प्रकार घडलाय, मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकसोबत. मात्र, अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्याला चांगलेच झापले आहे.
‘वाट बघतोय रिक्षावाला’ गाण्यात थिरकत मानसीने लाखो प्रेक्षकांच्या काळजावर वार केला होता. लॉकडाऊनच्या काळात इतर कलाकारांप्रमाणे, मानसी नाईकही सोशल मीडियावर आपला वेळ घालवत असते. वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून अभिनेत्री चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतेच तिने पोस्ट केलेल्या एका फोटोवर एका युजरने अतिशय गलिच्छ भाषेत कमेंट केली. ही कमेंट इतकी असभ्य होती की, मानसीला राग अनावर झाला. तिने एका लाईव्ह सेशनच्या दरम्यान, त्या युजरला चांगलाच धडा शिकवला. “तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिले? त्या त्यांच्या पोटापाण्यासाठी काम करतात. बुधवार पेठेत काम करणाऱ्या महिला मोठ्या धाडसाने कष्ट करतात. त्यांचे घर चालवण्यासाठी त्या प्रामाणिकपणे काम करतात. तुमच्यामध्ये हिम्मत असेल, तर तुम्हीही काम करून दाखवा,” असे म्हणत तिने युजरला धारेवर धरले.
काही दिवसांपूर्वीच मानसी नाईक बॉक्सर प्रदीप खरेरासोबत विवाहबंधनात अडकली आहे. यावरूनही तिला बरेच ट्रोल केले गेले. “लग्न करायला मराठी मुलगा मिळाला नाही का?” असे शब्द ऐकत तिला ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागला.
मानसी नाईक एक उत्कृष्ट डान्सर आहे. तिने ‘ढोलकीच्या तालावर’, ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ सारख्या अनेक मराठी रियॅलिटी डान्सिंग शोमध्ये भाग घेतला होता. या शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सने सर्वांना प्रभावित केले आहे. ती विशेष करून ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांसाठी ओळखली जाते. यासोबतच तिने ‘कुटुंंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘मर्डर मिस्ट्री’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










