नवीन वर्षाला सुरुवात होऊन आता एक आठवडा उलटलाय आणि दुसरा आठवडा सुरू आहे. पण या दोन आठवड्यात सिनेसृष्टीचे खूप नुकसान झाले आहे. कारण, अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अशातच आता सिनेसृष्टीतून आणखी एक दु:खद बातमी समोर येत आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय ८९ होते. वृद्धापकाळाने त्यांनी माहिम येथे शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
रेखा (Rekha Kamat) यांनी ६० पेक्षा अधिक वर्षे कलाविश्वाची सेवा केली. फक्त सिनेमाच नाही, तर नाटक आणि मालिकांमध्येही त्या झळकल्या. त्यांनी १९५२ साली राजा परांजपे यांच्या ‘लाखांची गोष्ट’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.
रेखा यांच्याविषयी थोडक्यात
सिनेसृष्टी गाजवणाऱ्या रेखा या कुमुद सुखटणकर या नावानेही ओळखले जातात. त्यांचे हे माहेरचे नाव आहे. त्यांचे शालेय शिक्षण दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीमध्ये झाले होते. शालेय शिक्षण घेत असताना त्या कथ्थक आणि भरतनाट्यम नृत्यप्रकारही शिकल्या. त्याचबरोबर भानुदास मानकामे आणि घोडके गुरुजींकडून त्यांनी गायनाचे धडे घेतल्याचेही सांगितले जाते.
हेही पाहा: कुणाचा व्हिडिओ गाजला, तर कुणाचा नवा चित्रपट येतोय; पाहा काय काय घडलंय
रेखा कामत यांची नाटके
रेखा यांनी अनेक नाटकात काम केले आहे. त्यामध्ये ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘संगीत एकच प्याला’, ‘ऋणानुबंध’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘संगीत पुण्यप्रभाव’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘संगीत भावबंधन’, ‘मला काही सांगायचं आहे’, ‘लग्नाची बेडी’, ‘सुंदर मी होणार’, ‘संगीत सौभद्र’, ‘गंध निशिगंधाचा’ यांसारख्या नाटकांचा समावेश होतो.
रेखा कामत यांचे सिनेम आणि मालिका
रेखा यांनी अनेक प्रसिद्ध सिनेमात काम केले आहे. त्यामध्ये ‘लाखाची गोष्ट’, ‘अगं बाई अरेच्छा!’, ‘कुबेराचं धन’, ‘गृहदेवता’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. तसेच त्यांनी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘प्रपंच’, ‘माणूस’, ‘सांजसावल्या’ आणि ‘याला जीवन ऐसे नाव’ यांसारख्या मालिकेतही काम केले होते.
हेही वाचा-
- एकदम कडक! पहिल्यांदाच आयोजित केलेल्या पीबीसीएल स्पर्धेत सुबोध भावेचा संघ विजयी, आदिश- सोहमची झक्कास खेळी
- ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतील सुपरहिट जोडी पुन्हा करणार प्रेक्षकांची ‘दिशाभूल’, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
- महाराष्ट्राच्या सौम्या कांबळेच्या डोक्यावर सजला ‘इंडियास बेस्ट डान्सर’च्या दुसऱ्या पर्वाचा ताज, आलिशान गाडीसोबत मिळाले १५ लाख