Monday, July 1, 2024

जिंकलंस भावा! अभिनेता स्वप्निल जोशीने केली मोठी घोषणा, सोशल मीडिया वापर आता करणार फक्त कोरोनासंबंधीत माहिती देण्यासाठी

कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयंकर आणि आव्हानात्मक ठरली आहे, यात शंका नाही. लोक आता बेहाल आणि असहाय्य झाले आहेत. रुग्णालयात जागा नाही, औषधांचा अभाव, ऑक्सिजन सिलिंडर्सची कमतरता, तसेच वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे असंख्य लोकांना दररोज आपला जीव गमावावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशाभरात सर्वत्र अशीच व्यथा आहे. तसेच, देशाच्या वैद्यकीय यंत्रणेची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. परंतु ज्याप्रमाणे अंधारामध्ये प्रकाश येतो, त्याचप्रमाणे या काळात अनेक लोक एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येताना पाहायला मिळत आहेत. खासकरून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक गरजूंपर्यंत पोहचण्याचा आणि एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशा परिस्थितीत, मराठी सिनेसृष्टीच्या ‘चॉकलेट बॉय’ स्वप्नील जोशीनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याने घोषणा केली आहे की, जोपर्यंत कोरोनाचा हाहाकार चालू आहे, तोपर्यंत तो मनोरंजनासाठी नव्हे, तर मदतीसाठी सोशल मीडियावर उपलब्ध असेल.

स्वप्नीलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “नमस्कार मित्रांनो, माझे इंस्टाग्रामवर येण्याचे कारण म्हणजे, मी इथून पुढे काही दिवस माझे फोटो, स्टोरी वगैरे पोस्ट करणार नाही. कारण या सर्व सोशल मीडियाचा वापर आपल्याला कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी करायचा आहे. यामुळे माझ्या अकाऊंटवर फक्त कोरोनाशी संबंधित माहिती व मदत तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच मी तुमच्याशी मनोरंजनाच्या माध्यमातून संपर्कात न राहता, मदतीच्या माध्यमातून राहील. माझे सोशल मीडिया हँडल योग्य प्रकारे वापरण्याचा, हा माझा छोटासा प्रयत्न आहे, धन्यवाद.”

या कामगिरीसाठी अभिनेत्याचे खूप कौतुक होत आहे. व्हिडिओच्याखाली कमेंट करत चाहते स्वप्नीलचे भरभरून कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे त्याने कॅप्शनमध्ये #mahacovid हे हॅशटॅग दिले आहे. हे हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. कोरोनाच्या या काळात तुम्हाला बेड, औषधे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, प्लाझ्मा संबंधित काहीही अडचण असेल, तर ती या हॅशटॅगशी जोडायला विसरू नका, असे आवाहन मराठी कलाकारांकडून करण्यात येत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी #mahacovid हे हॅशटॅग वापरून बऱ्याच पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. यामध्ये स्वप्नील जोशीसह हेमंत ढोमे, सोनाली कुलकर्णी, समीर विद्वांस यांसारख्या मराठमोळ्या कलाकारांचा समावेश आहे.

हे देखील वाचा