Saturday, June 29, 2024

‘अवघ्या १५ दिवसांत कोरोनाने माझा जिवलग मित्र खाल्ला!’ प्रविण तरडेंची फेसबुकवर भावनिक पोस्ट

कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत आहे. देशातच नव्हे, तर जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशक्त आणि इतर आजाराने ग्रासलेले लोक कोरोनाला लवकर बळी पडतात, असे म्हटले जाते. मात्र दररोज व्यायाम करून, अत्यंत निरोगी राहणारे लोकही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.

‘मुळशी पॅटर्न’ या हिट चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांनी फेसबुकवर एक दुःखद पोस्ट शेअर केली आहे. प्रविण यांनी नुकताच त्यांचा जिवलग मित्र कोरोनामुळे गमावला आहे. अभिनेता अमोल घावडे याचे कोरोनाला बळी पडून निधन झाले आहे. आपल्या जिवाभावाच्या मित्राची आठवण काढत, प्रविण यांनी ही भावुक पोस्ट शेअर केली आहे.

प्रविण तरडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, “माझा मित्र अमोल घावडे गेला. या कोरोनाने दररोज व्यायाम करणारा माझा धडधाकट मित्र अवघ्या १५ दिवसात खाल्ला. किती आठवणी…? ‘आणखी एक पुणेकर’ या एकांकीकेत पहिला डायलॅाग त्यानेच म्हटला होता म्हणुन, माझ्या प्रत्येक चित्रपटात एक तरी सीन अमोलसाठी लिहायचो. देऊळबंद , मुळशी पॅटर्न आणि आता सरसेनापती हंबीरराव या प्रत्येक चित्रपटात अमोल आहेच. ११ मे ला अमोलचा वाढदिवस असतो, म्हणुन तिन्ही चित्रपटाचं डबिंग आत्तापर्यंत त्याच्या वाढदिवसाला त्याच्याच डायलॅागने सुरू करायचो. हा माझ्या श्रध्देचा एक भाग होता. खुप मोठा बांधकाम व्यवसायिक, पण माझ्या एका शब्दावर देईल तो सीन करायला यायचा. १९९९ साली आपण पुरुषोत्तम जिंकलो, तेंव्हा तु कडकडून मारलेली मीठी कशी विसरू रे मित्रा! नॅशनल एकत्र खेळलो, एकांकीका केल्या, चित्रपट केले आणि आज एकटाच कुठेतरी निघून गेलास. तुझा शेवटचा मेसेज होता “बाय बाय प्रविण. बहुदा सरसेनापती हंबीरराव चित्रपट पाहायचा राहणार राव.” राहिलाच शेवटी. डोळ्यातील पाणी थांबत नाहीये रे आमल्या. जिथे कुठे असशील तिथे सुखी राहा. नाही तरी मी आणि पिट्या तुला “सुखी जीव” असच म्हणायचो की. सुखी राहा, कुटुंबाची काळजी करू नको, आम्ही आहोत मित्रा.”

https://www.facebook.com/pravin.tarde.9/posts/4131420866879157

या शब्दात प्रवीण यांनी आपल्या मित्रांची आठवण काढली आणि आपले दुःख व्यक्त केले.

तसेच, कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा, ही दुसरी लाट अधिक जीवघेणी निघाली. कोरोनाची प्रकरणं सातत्याने वाढतच आहेत. असंख्य निष्पाप जीवांचा याने बळी घेतलाय. आज राज्यात कोरोनाचे ६६,१९१ रुग्ण आढळले, तर ६१,४५० रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. याशिवाय ८३२ जणांचा कोरोनाने आज मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा