Tuesday, October 22, 2024
Home मराठी ‘पिंजरा’ सिनेमाचा सुवर्ण महोत्सव, ब्लॅकने तिकिटं विकणारे देखील सिनेमांमुळे झाले होते श्रीमंत

‘पिंजरा’ सिनेमाचा सुवर्ण महोत्सव, ब्लॅकने तिकिटं विकणारे देखील सिनेमांमुळे झाले होते श्रीमंत

मनोरंजविश्वात असे खूपच कमी वेळा घडते की, एखादा सिनेमा प्रदर्शित होतो आणि संपूर्ण जगात पुढचे अनेक वर्ष फक्त आणि फक्त त्याच सिनेमाची चर्चा होते. प्रत्येक बाबतीत उजवा ठरलेला आणि प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवणारा हा सिनेमा अनेक रेकॉर्ड बनवतो आणि ते रेकॉर्ड तोडणे तर दूरच मात्र त्याच्या आसपास पोहचणे देखील इतर सिनेमांना अशक्य होते. असाच काही वर्षांपूर्वी किंबहुना काही दशकांपूर्वी मराठीमध्ये एक सिनेमा प्रदर्शित झाला आणि एकच कल्ला झाला. जिकडे तिकडे त्याच सिनेमाची, त्यात असणाऱ्या सदाबहार लावण्यांची, कलाकारांचीच चर्चा होती. तो सिनेमा कदाचित तुम्ही सर्वानी ओळ्खलाच असेल हो, तो सिनेमा म्हणजे ‘पिंजरा.’

१९७२ मध्ये आलेल्या दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ या सिनेमाने प्रदर्शनानंतर एकच धुमाकूळ घातला. श्रीराम लागू, निळू फुले आणि संध्या यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमातील लावण्यांनी तर आजही लोकांना वेड लागते तेव्हा तर या लावण्यांसाठी लोकं जीव ओवाळून टाकायला देखील तयार होते. मराठीमधील पहिल्या रंगीत तमाशाप्रधान सिनेमाने तर मराठी चित्रपटांकडे बघण्याची लोकांची दृष्टीच बदलून टाकली. मराठीसोबतच या सिनेमाला १९७२ मध्ये हिंदीतही याच शीर्षकाने प्रदर्शित केले गेले. ३१ मार्च १९७२ साली अर्थात आजच्याच दिवशी ५० वर्षांपूर्वी हा सिनेमा प्रदर्शित झाला, आणि अजरामर ठरला. आज सिनेमाला होत असलेल्या ५० वर्षांच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याबद्दल अधिक खास गोष्टी.

पुण्यातील ‘प्रभात’ चित्रपटगृहात पिंजरा प्रदर्शित करण्यात आला आणि या सिनेमासोबत प्रदर्शित झालेल्या बॉलिवूडमधील इतर हिंदी सिनेमांना देखील झपाटून ‘पिंजरा’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या सिनेमाची कथा, गाणी, कलाकारांचा दमदार अभिय आदी सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनाचा ध्यास घेतला आणि सिनेमाला तुफान यश मिळाले. हा सिनेमा हिट होण्यामागे अजून एक खास कारण होते आणि ते म्हणजे सिनेमाचे अतिशय हलक्या पद्धतीने केले गेलेले प्रमोशन.

दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्याकडे सिनेमाच्या प्रमोशनसाठी पुरेसा वेळही नव्हता आणि पैसाही नव्हता . सिनेमाचे पोस्टर छापणे, ते संपूर्ण शहरात लावणे शक्य नव्हते. आता सिनेमाचे प्रमोशन करणार तरी कसे असा प्रश्न सर्वांनाच पडला. यावर व्ही. शांताराम यांनी एक नामी युक्ती शोधून काढली. त्यांनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी पुण्यातील रिक्षांची निवड केली आणि या रिक्षांवर त्यांनी फक्त ‘पिंजरा’ एवढा शब्द लिहिला. आता प्रत्येक तो शब्द दिसलेला आणि प्रश्न देखील पडायला लागला की, नक्की ‘पिंजरा’ आहे तरी काय? लोकांच्या मनात ‘या’ शब्दला घेऊन मोठे कुतूहल निर्माण झाले. या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी सर्वांनी ३१ मार्च १९७२ रोजी चित्रपटगुहांमध्ये तुडुंब गर्दी केली. सिनेमा इतका प्रचंड हिट झाली की, सिनेमा तयार व्हायला लागलेले २० लाख रुपये केवळ काही दिवसातच वसूल झाले.

या सिनेमाच्या यशाबद्दल सांगताना अनेकदा म्हटले जाते की, सिनेमा एवढा हिट झाला की, सिनेमाची तिकीटे ब्लॅकने विकणारे लोकं देखील खूप श्रीमंत झाले. या सिनेमामधील लावण्या तर आजही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसतात. तेव्हा तर या लावण्यांनी काय गजब केले असेल याचा आपण फक्त आणि फक्त विचार करू शकतो. श्रीराम लागू यांचा मराठीमधील हा पहिलाच पदार्पणाच्या सिनेमा होता आणि हा सिनेमा अमाप हिट झाला. तब्ब्ल १३४ आठवडे हा सिनेमा पुण्यातील चित्रपटगृहांमध्ये यशस्वी सुरु होता. १९७३ साली या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा