मर्दानी 3’चा ट्रेलर रिलीज होताच राणी मुखर्जीच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता अभिनेत्री अनुष्का शर्माही राणीची प्रशंसा करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाली आहे. अनुष्काने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाबाबतची आपली उत्सुकता व्यक्त केली आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘मर्दानी 3’चा ट्रेलर शेअर करत अनुष्काने लिहिलं, “अभिनंदन राणी. तुझं काम आणि तू जे काही करतेस त्यातील तुझी ग्रेस मला नेहमीच आवडली आहे. पुढे तू स्क्रीनवर काय कमाल करणार आहेस, हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी तुझी मोठी चाहती आहे.” अनुष्काच्या या प्रतिक्रियेवर चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, राणी मुखर्जी (Rani Mukerji)पुन्हा एकदा निडर आणि बेधडक IPS अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘मर्दानी’ फ्रँचायझीचा तिसरा भाग असलेला ‘मर्दानी 3’ या वेळी आणखी एका गंभीर सामाजिक विषयावर भाष्य करणार आहे. या चित्रपटात शिवानी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA)मध्ये सामील होताना दिसणार असून, दोन लहान मुलींच्या अपहरणाशी संबंधित थरारक प्रकरणाचा तपास करताना दाखवण्यात आली आहे.
2014 साली प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’मध्ये मानव तस्करीचा मुद्दा मांडण्यात आला होता, तर ‘मर्दानी 2’मध्ये महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांवर प्रकाश टाकण्यात आला. आता अभिराज मिनावाला दिग्दर्शित ‘मर्दानी 3’ देखील प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा विषय घेऊन येत आहे. 30 जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मृणाल ठाकूरने पूर्ण केले ‘डकैत’चे शूटिंग; निर्मात्यांनी शेअर केली खास पोस्ट










