2026 हे सिनेप्रेमींसाठी खूपच खास ठरणार आहे, कारण अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘धुरंधर 2’ पासून ते ‘टॉक्सिक’ सारखे चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहेत. अशातच नुकताच राणी मुखर्जी स्टारर ‘मर्दानी 3’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यामधून राणी मुखर्जी पुन्हा एकदा ‘शिवानी शिवाजी रॉय’ या दमदार भूमिकेत परतली आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतरच शिवानी शिवाजी रॉयच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
‘मर्दानी 3’ च्या ट्रेलरमध्ये राणी मुखर्जीच्या (Rani Mukerji)दमदार अंदाजासोबतच चित्रपटातील महिला खलनायिका ‘अम्मा’ हिचीही जोरदार चर्चा होत आहे. अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे—अखेर या भीषण भूमिकेत दिसणारी अभिनेत्री कोण आहे? चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटातील फीमेल विलेनबद्दल.
या वेळी ‘मर्दानी 3’ मध्ये राणी मुखर्जीचा सामना एका महिला खलनायिकेशी होणार आहे, जी चाइल्ड ट्रॅफिकिंग गँगची सरगना आहे. या खलनायिकेचं नाव अम्मा असून ती अत्यंत क्रूर आणि निर्दयी आहे. तिच्या क्रूरतेमुळे तब्बल 93 लहान मुलींचा बळी गेला आहे. ट्रेलरमध्ये अम्मा अतिशय भयावह आणि धक्कादायक स्वरूपात दिसते. तिची केवळ उपस्थितीच भीती निर्माण करते. सीनियर इन्स्पेक्टर शिवानी शिवाजी रॉयला या धोकादायक अम्माला पकडण्याची जबाबदारी देण्यात येते. अम्माची भूमिका अभिनेत्री मल्लिका प्रसाद हिने साकारली आहे.
ट्रेलरमध्ये अम्माच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मल्लिका प्रसाद ही एक अनुभवी अभिनेत्री, थिएटर आर्टिस्ट, दिग्दर्शक आणि अभिनय प्रशिक्षक आहे. ती मूळची बेंगळुरू येथील असून तिने लंडनच्या गोल्डस्मिथ्स कॉलेज मधून परफॉर्मन्स मेकिंग मध्ये मास्टर्स केलं आहे. याशिवाय, तिने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) येथून अभिनयात पोस्ट-ग्रॅज्युएशनची पदवीही घेतली आहे.
मल्लिका प्रसादने 1999 साली कन्नड चित्रपट ‘कनूर हेग्गदिथि’ मधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘गरवा’, ‘माआ मयूरी’ आणि ‘मुस्संजया कथा प्रसंगा’ यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयामुळे प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अलीकडच्या काळात ती नेटफ्लिक्सवरील चर्चित वेब सिरीज ‘द किलर सूप’ आणि अनुराग कश्यपच्या ‘ऑलमोस्ट प्यार’ या चित्रपटातही झळकली होती.
अभिनयासोबतच मल्लिकाने ‘माय एला’ नावाच्या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शनही केले असून, या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कन्नड प्रेक्षकांमध्ये ती आधीपासूनच लोकप्रिय असून, आता ‘मर्दानी 3’ मधील प्रभावी भूमिकेमुळे हिंदी सिनेप्रेमींमध्येही ती चर्चेचा विषय ठरत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा


