कंगना राणावत सध्या सगळ्यांच्याच निशाण्यावर आली आहे. याला कारणही कंगना स्वतःच असल्याचे दिसत आहे. त्यातही कंगनाने जेव्हापासून शेतकऱ्यांच्या आंदोलनावर बोलायला सुरुवात केली. तेव्हापासूनच कंगना विरुद्ध बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढत आहे.
सध्या सामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटीजपर्यंत सर्वजण तिच्यावर टीका करत आहे. त्यात आता प्रसिद्ध गायक मिका सिंगने देखील कंगनाला सल्ला देत एक खोचक प्रश्न विचारला आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते आपण पाहूयात.
दलजित दोसांझ आणि कंगनाचे ट्विटर वॉर प्रकरण ताजे असतानाच त्यात आता मिका सिंगची भर पडली आहे. कंगनाने एक ट्विट केले होते, ज्यात तिने तिच्यावर नोंदवण्यात येणाऱ्या केसेसबद्दल वक्तव्य केले होते. याच ट्विटला उत्तर देताना मिकाने म्हटले, “तुझे नक्की काय ध्येय आहे, हेच मला समजत नाही. तू इतकी हुशार, प्रतिभावान आणि सुंदर आहेस, मग अचानक तुझ्यात असलेली देशभक्ती तू ट्विटर आणि न्यूजवर का दाखवायला सुरुवात केली आहेस?”
यासोबतच त्याने अजून एक ट्विट करत तिला एक सल्ला देखील दिला आहे. तो म्हणतो, ” मी आणि माझी संपूर्ण टीम रोज ५ लाख लोकांना जेवू घालत आहे. तू आमच्या सोबत ये आणि हे पुण्याचे काम कर. तू दररोज २० लोकांना जरी जेवू घातले तरी तुला खूप पुण्य मिळेल. सोशल मीडियावर असे ट्विट करून वाघ होणे खूप सोपे आहे. मात्र, आमच्यासारखे काम करणे कठीण आहे.”
कंगनाने थोड्याच दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते, ज्यात तिने “सर्वच जणं सध्या फक्त मलाच टार्गेट करत असून माझ्यावर केसेस टाकण्यात व्यस्त आहे. अनेक चित्रपट माफियांनी माझ्यावर केस नोंदवली आहे. त्यात जावेद अख्तर यांची भर पडली आहे. त्यानी देखील नुकताच माझ्यावर मानहानीचा दावा केला आहे आणि महाराष्ट्र, पंजाब सरकार सुद्धा माझ्यावर केस नोंदवत आहे. बहुतेक हे सर्व लोक मला महान बनवूनच दम घेणार आहेत.” असे म्हटले होते. तिच्या याच ट्विटला मिकाने उत्तर दिले आहे.