Monday, July 1, 2024

जेव्हा मिथुनदा आणि श्रीदेवीच्या किसींग सीनमुळे झालेला मोठा राडा, अभिनेत्रीने थेट पत्रकारांपुढेच…

‘ग्रँडमास्टर’, ‘सुपरस्टार’, ‘डिस्को डान्सर’ अशी विविध उपमा मिळवणारे दिग्गज अभिनेते म्हणजे मिथून चक्रवर्ती. (mithun chaturvedi)  मिथुनदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिथून यांनी आपल्या कारकिर्दीत ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांनी सलग चित्रपट करण्याचे विक्रमही केलेत, पण आता एवढा मोठा स्टार म्हणल्यावर सगळंच छानछान कसं असेल, काहीतरी तर कॉन्ट्रोव्हर्सी झाली असेलच ना. त्यातही बॉलिवूड म्हणलं की, कॉन्ट्रोव्हर्सी न झालेले अभिनेते अगदी मोजकेच असतील, पण त्यात मिथुनदा नाहीत. त्यांच्याही करियरमध्ये त्यांना काही वादांना सामोरे जावे लागले आहे. बरं मिथून ज्यावेळी सुपरस्टार होते. त्याचवेळी श्रीदेवीचेही (shridevi)  चित्रपट हिट होत होते. तिला ‘पहिली वूमन सुपरस्टारही’ म्हटले जाते. त्यामुळे मिथून आणि श्रीदेवी यांचे एकत्र चित्रपट आले आणि गाजलेही, पण एका चित्रपटावेळी मात्र मोठा राडा झाला. नक्की काय झालं होतं, चला जाणून घेऊया…

साल होतं १९८९. त्यावेळी मिथून आणि श्रीदेवी यांची प्रमुख भूमिका असलेला गुरू चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी श्रीदेवी ही अशी ऍक्ट्रेस होती, जिचा किसीग सिन किंवा बोल्ड सीन द्यायला विरोध असायचा, पण गुरू चित्रपटातील जवळपास शूट पूर्ण होत असतानाच श्रीदेवी आणि मिथून यांच्यात किसिंग सिन शूट होणार होता. मात्र, यासाठी श्रीदेवी यांनी विरोध केला. त्यांनी आधीच असे सीन न करण्याबद्दल सांगितले होते, पण दिग्दर्शन उमेश मेहरा यांनी श्रीदेवीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. काहीच फायदा झाला नाही आणि श्रीदेवीने हे मान्य केले नाही, पण जेव्हा चित्रपट रिलीज झाला, तेव्हा मात्र त्यात मिथून आणि श्रीदेवी यांचा किसींग सीन होता. हे पाहून श्रीदेवीला काय झालं याचा अंदाज आला असावा. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर याच गोष्टीवर मोठा वाद झाला.

कारण अनेक रिपोर्ट्सनुसार, उमेश मेहरा यांनी बॉडी डबलचा वापर करत हा सीन शूट केला होता. म्हणजे तिथे दुसरी व्यक्ती होती, पण चित्रपटात असं दिसत होतं की, तिथे श्रीदेवी आहे. त्या गोष्टीमुळे श्रीदेवी यांच्या घरचेही नाराज झाल्याचे तिने सांगितले होते. या गोष्टीमुळे श्रीदेवी इतकी वैतागली होती की, तिने पत्रकार परिषदेत सांगितलं की, तिला फसवलं गेलं असून, तिने असा कोणताही सीन शूट केलेला नाही, बॉडी डबलकडून हा सीन शूट झाला आहे, पण नंतर उमेश मेहरा यांनीही सांगितलं की, हा सीन खरा होता.

म्हणतात ना वेळ सर्वकाही नीट करते तसंच झालं. या गोष्टीला लोक विसरून गेले. पुढे श्रीदेवी आणि मिथून यांची मैत्रीही झाली. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. गुरू चित्रपट येण्यापूर्वीच श्रीदेवी आणि मिथून यांच्यातील अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. त्यांच्यात १९८४ मधील ‘जाग उठा इन्सान’ या चित्रपटापासून अफेअर सुरू झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्यांनी गुपचूप लग्नही केल्याचे अनेक रिपोर्ट्स सांगतात. मात्र, मिथून यांचे १९७९ मध्येच योगिता बाली यांच्याशी लग्न झाले होते. त्यामुळे जेव्हा योगिता यांना याबद्दल कळाले, तेव्हा त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला. यानंतर मात्र, मिथून आणि श्रीदेवी यांचे नाते तुटले. त्यांचे नाते तुटल्यानंतर ‘गुरू’ हा चित्रपट आला होता. असो, नंतर श्रीदेवीने बोनी कपूर यांच्याशी लग्न केले आणि मिथून यांनीही योगिता बालीशी आपले लग्न टिकवून ठेवत संसार केला. दोघांनीही पुढे आपापल्या आयुष्यात मोठे यश कमावले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
दोघं संगतीनं…! थेट बायकोला घेऊन सोशल मीडियावर हवा करणारे जोडपे, जगभरात गाजतंय यांचं नाव
बाप आणि त्याचं मुलांवरील प्रेम ‘या’ सिनेमांनी दाखवून दिलं, एका क्लिकवर घ्या जाणून
एकाला संधी मिळावी म्हणून घरातले सगळे तडफडतात, पण तिकडं गोविंदाच्या तीन पिढ्या गाजवतायत फिल्मइंडस्ट्री

हे देखील वाचा